भाजपच्या मतांमध्ये तिप्पट वाढ

भाजपच्या मतांमध्ये तिप्पट वाढ

पुणे - महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच स्वबळ अजमाविलेल्या भाजपला गेल्या निवडणुकीच्या तिप्पट म्हणजे, जवळपास ३७ टक्के मते मिळाली आहेत; तर एकेकाळी सत्ताधारी असलेल्या काँग्रेसची अवस्था ‘दीनवाणी’ झाली आहे. त्यांना जेमतेम आठ टक्के मते मिळाली. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ कमी झाले आहे. या पक्षाची मते गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ३ टक्‍क्‍यांनी कमी झाली आहेत. 

महापालिका निवडणुकीत १९९२पासून काँग्रेसला यंदा नीचांकी मते मिळाली आहेत. त्यांचे संख्याबळ २९वरून नऊपर्यंत घसरले आहे. शिवसेनेच्या जागा घटल्या असल्या, तरी त्यांच्या मतांच्या टक्‍केवारीत वाढ झाली असून, १४ टक्के मते मिळाली आहेत. २०१२च्या निवडणुकीत चांगली कामगिरी करीत २० टक्‍क्‍यांहून अधिक मते घेतलेल्या मनसेची मते या निवडणुकीत सहा टक्‍क्‍यांपर्यंत खाली आली आहेत.

यंदाच्या निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील सत्ता हिसकावून घेण्याची भाजपची रणनीती होती; तर महापालिका भाजपच्या हाती जाऊ द्यायची नाही, अशी व्यूहरचना राष्ट्रवादी काँग्रेसने आखली होती. राज्यात पडझड झाली तरी पुण्यातील ताकद कायम ठेवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. शिवसेनेनेही ही लढाई प्रतिष्ठेची केली होती. मात्र सर्वाधिक ९८ जागांवर यश मिळवत भाजपने निर्विवाद बहुमत मिळवले असून, या पक्षाला सर्वाधिक ३६.९२ टक्के मते मिळाली आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपला १२.४८ टक्के मते मिळाली होती; तसेच सर्वाधिक २५ टक्के मते घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने यंदाच्या निवडणुकीत २१.९२ टक्के मते घेतली. शिवसेनेची ताकद वाढल्याचे त्यांना मिळालेल्या मतांच्या आकड्यावरून स्पष्ट झाले आहे. त्यांना गेल्या निवडणुकीत ९.५३ टक्के मते मिळली होती. त्यात पाच टक्‍क्‍यांची भर पडली असून, त्यांना १४.१६ टक्के इतकी मते मिळाली आहेत. मनसेच्या मतांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. गेल्या निवडणुकीत या पक्षाला २०.६० टक्के मते मिळाली होती. या निवडणुकीत मनसेला केवळ ६.१० टक्के मतांवर समाधान मानावे लागले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com