‘एसएमएस’ आला रे! तब्बल १५ लाख 

मंगेश कोळपकर 
गुरुवार, 19 जानेवारी 2017

महापालिका निवडणुकीदरम्यान शहरातील सुमारे १५ लाख नागरिकांपर्यंत पक्षाचे थेट एसएमएस पाठविण्यासाठीचे नियोजन भारतीय जनता पक्षाने केले आहे.

मतदारांच्या हजारी याद्या संगणकीकृत करणे, प्रचारक साहित्याचे वाटप आणि नियोजन करणे, ऑनलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना मार्गदर्शन तसेच सोशल मीडियाद्वारे मतदारांपर्यंत पोचण्यासाठी भाजपची ‘वॉर रूम’ सज्ज झाली आहे.

महापालिका निवडणुकीदरम्यान शहरातील सुमारे १५ लाख नागरिकांपर्यंत पक्षाचे थेट एसएमएस पाठविण्यासाठीचे नियोजन भारतीय जनता पक्षाने केले आहे.

मतदारांच्या हजारी याद्या संगणकीकृत करणे, प्रचारक साहित्याचे वाटप आणि नियोजन करणे, ऑनलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना मार्गदर्शन तसेच सोशल मीडियाद्वारे मतदारांपर्यंत पोचण्यासाठी भाजपची ‘वॉर रूम’ सज्ज झाली आहे.

जंगली महाराज रस्त्यावरील ‘सन्मान’मध्ये साकारलेल्या वॉर रूमचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच झाले. भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शैली अंगीकृत केल्याचे दिसून आले. निवडणुकीच्या आखाड्यात ‘वॉर रूम’ सक्रिय राखण्यासाठी २५ जण सकाळी दहापासून रात्री उशिरापर्यंत वॉर रूममध्ये काम करीत आहेत.  

पाणी परिषद, कॅशलेस व्यवहार कसा करावा, प्रारूप जाहीरनामा आदींच्या पुस्तिका पक्षाने तयार केल्या आहेत. सुमारे पाच लाख मतदारांपर्यंत टप्प्याटप्प्याने त्या पोचविण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या पुस्तिका घरी पोचल्याची खात्री करण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांत सुमारे १५ हजार मतदारांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आहे. प्रत्येक प्रभागातील इच्छुक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची निवडणूक संचलन समिती कार्यान्वित झाली आहे. त्याद्वारे शहर कार्यालयाशी ऑनलाइन पद्धतीने संपर्क साधण्यात येत आहे. शहरातील पाच हजार कार्यकर्त्यांचे प्रत्येकी २५० जणांचे व्हॉट्‌सॲपचे ग्रुप करण्यात आले आहेत. त्यात ४१ प्रभागांतील समन्वयकांचाही समावेश करण्यात येत आहे. तसेच पक्षाचे भाजप पुणे सिटी हे फेसबुक पेजही अद्ययावत करण्यात येत आहे. प्रभागानुसार सोशल मीडियाचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले आणि कार्यालयमंत्री उदय जोशी यांनी दिली. 

या वॉर रूममध्ये सध्या साडेदहा लाख नागरिकांचे दूरध्वनी क्रमांक जमा केले असून येत्या आठ दिवसांत उर्वरित दूरध्वनी क्रमांकांचे  संकलन होईल. निवडणुकीदरम्यान काहीवेळा पक्ष मतदारांशी थेट संपर्क साधणार आहे. तसेच १ लाख ९२ नागरिकांनी भाजपचे प्राथमिक सदस्यत्व घेतले आहे. कार्यकर्ते त्यांना भेटून मुख्य प्रवाहात सहभागी करणार आहेत. प्रत्येक प्रभागातील इच्छुक, कार्यकर्त्यांना कोणतीही मदत देण्यासाठी वॉर रूम सज्ज झाली आहे. त्यासाठी गोगावले, जोशी यांच्यासह विनायक आंबेकर, सचिन मांढरे, जितेंद्र कावेडिया, प्रतीक धात्रक, अविनाश निकम, अजय धोंगडे, डॉ. अजय दुधाणे यांचे प्रयत्न सुरू आहेत. 

Web Title: bjp war room