धक्कादायक, खेडमधील स्वॅबसाठीची यंत्रणा धूळ खात पडून...भाजपकडून आंदोलनाचा इशारा

राजेंद्र सांडभोर
गुरुवार, 9 जुलै 2020

आता कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली, तरी सरकार या प्रस्तावांचा विचार करीत नसल्याने भाजपने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

राजगुरूनगर (पुणे) : कोरोना फैलाव सुरू झाला तेव्हा प्रस्तावित केलेली खेड तालुक्यातील चांडोली, चाकण, आळंदी येथील केविड केअर सेंटर अजूनही निधी आणि मनुष्यबळाअभावी सुरूच करण्यात आलेली नाहीत. चांडोली येथील यंत्रणा धूळखात पडून आहे. 

वाळूमाफियांकडून महिला तहसीलदारांवर पाळत

खेड तालुक्यात आता कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे हि कोविड केअर सेंटर त्वरित सुरू न केल्यास भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षाचे गटनेते शरद बुट्टे पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी दिला आहे.

पुणेकरांच्या बेशिस्तीचे घडले दर्शन

कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात चांडोली, चाकण, आळंदी येथील रुग्णालयांमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली होती. त्यादृष्टीने बेड सज्ज करण्यात आले. त्यानंतर एकंदर उपकरणे, साहित्य सामग्री आणि डॉक्टर व कर्मचारी यांची व्यवस्था गृहीत धरून अंदाजपत्रक करण्यात आले आणि प्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात आले. मात्र, प्रथमतः तालुक्यात रुग्णसंख्या वाढीचा वेग कमी असल्याने या सेंटरची फारशी निकड भासली नाही. त्यामुळे कोणी पाठपुरावा केला नाही. अधिकाऱ्यांनीही स्वतःहून त्यात रस दाखविला नाही. दरम्यान, महाळुंगे कोविड केअर सेंटर उभारण्यात आल्याने या प्रस्तावांकडे अधिकच दुर्लक्ष झाले.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

मात्र, आता कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली, तरी सरकार या प्रस्तावांचा विचार करीत नसल्याने भाजपने आंदोलनाचा इशारा दिला आहे. काल बुट्टे पाटील व देशमुख यांनी अचानक चांडोली ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन कोविड सेंटरची पाहणी केली. त्यावेळी प्रस्तावित कोविड सेंटरमध्ये फक्त ६५ खाटा आणि रुग्णांच्या घशातील द्राव घेण्यासाठी उभारलेली यंत्रणा धूळ खात पडून असल्याचे पाहावयास मिळाले.

महाळुंगे कोविड सेंटरसाठी ९ कोटी रुपयांचा, तर चांडोलीसाठी १ कोटी ७० लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हा पातळीवर मंजुरीसाठी प्रलंबित आहे. त्याचा आम्ही पाठपुरावा करणार आहोत. या सेंटरसाठी डॉक्टर, कर्मचारी आणि निधी देखील उपलब्ध होण्याची आवश्यकता आहे. तसेच, तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या पातळीवर कोरोनाबाधित रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी खेडच्या प्रांताधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यांनी खासगी क्षेत्रातील रुग्णवाहिका यासाठी तातडीने उपलब्ध करून देऊ, असे सांगितले.
 - शरद बुट्टे पाटील  

Edited By : Nilesh Shende


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP warns of agitation for Kovid Care Center in Khed taluka