रवींद्र धंगेकरांच्या अडचणी वाढणार? भाजप निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार! - Kasba Bypoll Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ravindra Dhangekar

Kasba Bypoll Election : रवींद्र धंगेकरांच्या अडचणी वाढणार? भाजप निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार!

Kasba Bypoll Election : कसबा विधानसभा मतदारसंघातील नाट्यमय घडामोडी प्रचार संपल्यानंतरही थांबायला तयार नाहीत. कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानाला आता २४ तासांपेक्षा कमी अवधी शिल्लक राहिला आहे. कसब्यात भाजपने पैसे वाटल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला. धंगेकर यांनी फक्त आरोप केला नाही तर ते आज सकाळी कसबा गणपतीसमोर उपोषणाला बसले होते. संबधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर धंगेकरांनी हे उपोषण मागे घेतलं आहे.

मात्र आता धंगेकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण आचार संहितेचा भंग केला म्हणून भाजपच्या शिष्टमंडळाने रवींद्र धंगेकर यांची पोलिस आयुक्तालयात तक्रार दाखल केली आहे.

तसेच भाजप निवडणूक आयोगात देखील तक्रार दाखल करणार आहे. धंगेकर यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी भाजप करणार आहे. भाजपचे संघटन मंत्री राजेश पांडे यांनी ही माहिती दिली. 

राजेश पांडे म्हणाले, "महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पराभव स्पष्ट दिसत आहे. आजचे उपोषण हा त्यांचा स्टंट आहे. यापूर्वी देखील त्यांनी असे स्टंट केले आहेत. कसब्यातील जनतेला हे माहित आहे. धंगेकर यांच्या रॅलीला प्रतिसाद मिळाला नाही. धंगेकरांच्या स्टंटबाजीमुळे कसब्यातील मतदार दुखावला आहे."

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार काल ५ वाजचा प्रचार संपला. तर आज कसबा गणपतीसमोर हा प्रचाराचा भाग होत नाही का, असा माझा सवाल असल्याचे राजेश पांडे म्हणाले.

टॅग्स :BjpPune Newspune