‘विजयोत्सव’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

कमल फुलल्याने शहर-उपनगरांत गुलालाची उधळण, घोषणाबाजी, पेढेवाटप

पुणे - महापालिकेवर भाजपचे कमळ फुलल्याचे चित्र स्पष्ट होताच कार्यकर्त्यांनी शहर आणि उपनगरांमधील रस्त्यांवर भाजपचे झेंडे फडकावून गुलाल आणि भगव्या रंगाची उधळण केली. तसेच प्रचंड घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला.

शहर आणि उपनगरांमधील मतमोजणी केंद्राबाहेर सकाळी दहापासून निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या कार्यकर्त्यांना विजयी झाल्याचे निकाल मिळताच प्रचंड घोषणाबाजी, एकमेकांना पेढे वाटत, गुलालाची उधळण करत, दुचाकी आणि चारचाकी गाड्यांवरून झेंडे घेऊन तरुण कार्यकर्ते जल्लोष करत असल्याचे चित्र दिसून आले. 

शहर आणि उपनगरांमधील प्रभागांमध्ये काही ठिकाणी संपूर्ण पॅनेल, तर काही ठिकाणी निम्मे पॅनेल असे अंतिम निकाल हाती येत असताना विजयोत्सवाची तयारी कार्यकर्त्यांनी सुरू केली होती. शहरातील भाजपच्या कार्यालयाकडे सर्व कार्यकर्ते धाव घेताना दिसत होते. शहर आणि उपनगरातील चौकांमध्ये फटाके वाजविण्यात आले. विजयी उमेदवारांचे अभिनंदन करणारे फ्लेक्‍स तयार करण्यासाठी कार्यकर्ते लगबग करत असल्याचे दिसून आले.  

गेल्या महिन्यापासून आपल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी पदयात्रा, कोपरा सभा, प्रभात फेऱ्या आणि नेत्यांच्या जंगी जाहीर सभांमध्ये अहोरात्र कष्ट घेतल्यानंतर मिळालेल्या विजयाचा आनंद युवक, महिला आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यांवर स्पष्ट झळकत होता. विजयाचा निकाल जाहीर होताच काही कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत अश्रू अनावर होत होते. 

शहरातील विविध प्रभागांमधील विजयी उमेदवारांच्या निवडणूक कचेरीसमोर कार्यकर्ते एकत्र जमून घोषणाबाजी, फटाक्‍यांची आतषबाजी करून एकमेकांना पेढे भरवीत होते. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांसह विजयी उमेदवारांच्या छबी असलेले फ्लेक्‍स उभारण्यासाठी चौकांमध्ये कार्यकर्त्यांची लगबग दिसून आली.

शहराच्या मध्यवर्ती भागातील फर्ग्युसन रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, शिवाजी रस्ता आणि केळकर रस्त्यावरून विजयी उमेदवारांचे कार्यकर्ते दुचाकी रॅली काढून घोषणाबाजी करत जात होते. एकूणच निवडणुकीतील विजयाचा रंग शहरातील चौकाचौकांमध्ये पुणेकरांना अनुभवायला मिळाला. 

दरम्यान, पराभूत उमेदवारांच्या गोटात मात्र शांतता पसरली होती. त्यांच्या निवडणूक कचेरीमध्ये तुरळक कार्यकर्ते टीव्हीवर निकाल पाहत असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे ‘कहीं खुशी कहीं गम’ अशीच परिस्थिती शहर आणि उपनगरांमध्ये दिसून आली.

Web Title: bjp win in pune municipal election