चारही जागांवर अनपेक्षितपणे कमळ फुलले

मंगेश कोळपकर - @MkolapkarSakal
बुधवार, 1 मार्च 2017

घरोघरी नेमका केलेला प्रचार, नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी आणि कार्यकर्त्यांनी दिलेली साथ यामुळे पुणे विद्यापीठ- वाकडेवाडी प्रभागातील (क्र. ७) चारही जागांवर अनपेक्षितपणे कमळ फुलले. मतदारांनी भरभरून मतदान केल्यामुळे एकच ‘पॅनेल’ चालले.

घरोघरी नेमका केलेला प्रचार, नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी आणि कार्यकर्त्यांनी दिलेली साथ यामुळे पुणे विद्यापीठ- वाकडेवाडी प्रभागातील (क्र. ७) चारही जागांवर अनपेक्षितपणे कमळ फुलले. मतदारांनी भरभरून मतदान केल्यामुळे एकच ‘पॅनेल’ चालले.

या प्रभागात भाजपच्या अनुसूचित जातीच्या अ गटात सोनाली लांडगे, अनुसूचित जमातीच्या ब गटात राजश्री काळे, नागरिकांच्या मागास प्रवर्गात क गटात आदित्य माळवे आणि खुल्या वर्गातील ड गटात रेश्‍मा भोसले विजयी झाल्या. या प्रभागात काँग्रेसकडून रूपाली मोरे, नंदा रोकडे, छाया शिंदे आणि दत्ता बहिरट; राष्ट्रवादीकडून आशा साने, धनश्री चव्हाण, रवींद्र ओरसे, नीलेश निकम; शिवसेनेकडून वनमाला कांबळे, सुरेखा भवारी, विनोद ओरसे आणि हरिश निकम, तर मनसेकडून जयश्री रणदिवे, शंकर पवार आणि श्‍यामराव माने यांनी निवडणूक लढविली. सुशिक्षित वर्गाबरोबरच वस्ती भागातून प्रतिसाद मिळाल्यामुळे भाजपचे चारही उमेदवार चांगल्या मताधिक्‍याने विजयी झाले. त्यासाठी धनशक्तीचा मोठा वापर झाल्याचा आरोप भाजप वगळता अन्य सर्व पक्षांकडून करण्यात येत आहे.

आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्‍मा यांना राष्ट्रवादीने ऐनवेळी उमेदवारी नाकारली. त्यामुळे त्यांना भाजपने उमेदवारी दिली; परंतु अधिकृत उमेदवारी पत्र (एबी फॉर्म) दाखल करण्यास विलंब झाला. त्यानंतर विशेष सुनावणीत भाजपची उमेदवारी मिळाल्यावर बहिरट यांनी आक्षेप घेतला आणि उच्च न्यायालयाने भोसले यांना अपक्ष ठरविले. परिणामी हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. तेथेही त्या अपक्षच उमेदवार ठरल्या. त्यामुळे बहिरट विरुद्ध भोसले, या लढतीबद्दल औत्सुक्‍य निर्माण झाले. न्यायालयीन प्रक्रियेमुळे भोसले यांना प्रचारासाठी वेळ कमी मिळाला असला, तरी भाजपच्या सहकारी उमेदवारांनी एकत्रित प्रचार सुरू ठेवला होता. ‘तीन कमळ आणि रेश्‍मा भोसले’ असा प्रचार केला. घरोघरी प्रचारावर त्यांनी भर दिला होता. माळवे हे भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष होते. त्यामुळे युवकांची मोठी फौज त्यांच्याकडे होती; तसेच आमदार विजय काळे यांनी व्यक्तिशः या प्रभागात लक्ष दिले. अनेक सोसायट्यांशी त्यांनी सातत्याने संपर्क साधला. त्यातच राजश्री काळे या पारधी समाजातील असून, त्यांनी स्वतःच्या संघटनेच्या माध्यमातून केलेले काम मतदारांपर्यंत पोचविण्यात त्यांना यश आले.

काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक बहिरट; तसेच शिंदे यांनी नेटाने प्रचार केला. त्यामुळे भोसले यांच्यापुढे आव्हान निर्माण झाले होते. शिवसेनेचे ओरसे, निकम; तसेच राष्ट्रवादीचे नीलेश निकम यांनीही जोरदार प्रचार केला; परंतु भाजपच्या नियोजनबद्ध प्रचारापुढे ते कमी पडले. त्यातच ‘कमळा’बद्दलच्या सुप्त लाटेचे परिवर्तन विजयात करण्याची किमया माळवे, काळे आणि भोसले यांनी केल्यामुळे प्रभागावर भाजपचे वर्चस्व राहिले.

Web Title: bjp win in ward no. 7