...तर भाजप 148 जागांवर विजयी असते !

- मंगेश कोळपकर
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

पुणे - महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे 98 उमेदवार निवडून आले असले, तरी तब्बल 50 जागांवर पक्षाचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे 162 पैकी तब्बल 148 जागांवर भाजपचे लक्षणीय अस्तित्व असून, एका "धक्‍क्‍याने' भाजपच्या धावफलकात मोठी भर पडू शकली असती. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 52 उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांच्यापैकी काहींना विजय मिळाला असता, तर तो पक्षही स्पर्धेत येऊ शकला असता, असे दिसून आले आहे.

महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपमध्येच लढत झाली. महापालिकेत यापूर्वी 26 नगरसेवक असलेल्या भाजपने यंदा 98 जागांपर्यंत मजल मारली आहे. मात्र, पक्षाचे 50 उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनाही पक्षाकडून "धक्का' दिला गेला असता, तर विजयी उमेदवारांची संख्या अजूनही वाढली असती, असे निकालातून स्पष्ट झाले आहे. कॉंग्रेसचेही 29 वरून संख्याबळ घटून 9 वर पोचले असले, तरी त्यांचे 22 ठिकाणी उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते.

अर्थात, राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेसने 104 जागांवर आघाडी केली होती, त्यामुळेही दोन्ही पक्षांचे मिळून 74 उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले. शिवसेनेने पहिल्यांदाच या वेळी भाजपशी युती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढविली, त्यासाठी पक्षाने जोमाने प्रचार केला, तरीही त्यांची गाडी 10 जागांपेक्षा पुढे सरकलेली नाही. मात्र, त्यांचे उमेदवार 25 ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर राहिले, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आठच उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांच्या पूर्वीच्या 29 सदस्य संख्येतून काही उमेदवार भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये ऐनवेळी गेले होते, हेही लक्षात घ्यावे लागेल.

पाच अपक्ष दुसऱ्या क्रमांकावर
"एमआयएम'ने एक जागा पटकावत शहरात खाते उघडले, तरी येरवडा प्रभाग क्रमांक 6 मध्ये ब गटात त्यांच्या उमेदवार सायरा शेख या दुसऱ्या क्रमांकावर होत्या. बहुजन समाज पार्टीचे सोनू निकाळजे यांनीही ताडीवाला रोड- ससून प्रभाग क्रमांक 20 मध्ये ड गटात दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवत लक्षवेधी लढत दिली. रामटेकडी- सय्यदनगर प्रभाग क्रमांक 24 मध्ये ब गटात अपक्ष उमेदवार सारिका शिंदे यांचा अवघ्या 173 मतांनी पराभव झाला. याच प्रभागात क गटात राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार फारूक इनामदार यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचेच आनंद अलकुंटे होते. राष्ट्रवादीच्याच दोन उमेदवारांत झालेल्या लढतीत अलकुंटे विजयी झाले. नवी पेठ- पर्वती प्रभाग क्रमांक 29 मध्ये ड गटात कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार सुधीर काळे यांनीही दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली.

19 उमेदवारांचा निसटता पराभव
या निवडणुकीत 19 उमेदवारांचा 1000 पेक्षा कमी मतधिक्‍याने पराभव झाला. त्यात भाजपचे 10, राष्ट्रवादीचे 4, शिवसेनेचे 2, मनसे, एमआयएम आणि अपक्ष, अशा प्रत्येकी एकाचा समावेश आहे. भाजपच्या पाच जागा तर फक्त 500 पेक्षा कमी मतांनी पराभूत झाल्या आहेत.
- निसटता पराभव झालेले उमेदवार
- भाजप ः जीवन जाधव 67, राहुल कोकाटे 128, सुवर्णा मारकड 181, अरविंद कोठारी 266, अभिजित कदम 283, मोहिनी देवकर 405, रफीक शेख 510, सुनीता लिपाणे 522, रोहिणी भोसले 581, मिहीर प्रभूदेसाई 796.
- राष्ट्रवादी ः विद्या बालवडकर 238, सुरेखा कवडे 240, मनीषा मोहिते 244, दिलीप जांभूळकर 351.
- मनसे ः बाबू वागस्कर 442
- शिवसेना- तृप्ती शिंदे 744
- अपक्ष - सारिका शिंदे 173
- एमआयएम- सायरा शेख 1002

विजयी उमेदवारांचे साधारण मताधिक्‍य
पक्ष --- मताधिक्‍य 1 ते 5 हजार ------5 ते 10 हजार ----10 हजारपेक्षा जास्त
भाजप - 46-------------------------20---------------------25
राष्ट्रवादी - 29 ----------------------07--------------------02
कॉंग्रेस - 05-------------------------03---------------------00
शिवसेना - 03----------------------02----------------------00
मनसे - 01----------------------00-----------------------00

Web Title: Is the BJP won 148 seats