कार्यकारिणी बैठकीसाठी कामगारनगरी सज्ज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

पिंपरी - भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक चिंचवड येथे बुधवारी (ता. २६) व गुरुवारी (ता. २७) होणार आहे. या बैठकीसाठी कामगारनगरी सज्ज झाली आहे. बैठकीची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.

पिंपरी - भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक चिंचवड येथे बुधवारी (ता. २६) व गुरुवारी (ता. २७) होणार आहे. या बैठकीसाठी कामगारनगरी सज्ज झाली आहे. बैठकीची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.

बुधवारी सकाळी अकरा वाजता हॉटेल कलासागर येथे प्रदेश भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी दोन वाजता चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कार्यकारिणीच्या बैठकीचे उद्‌घाटन होणार आहे. या बैठकीला राज्यातील ६५ जिल्हाध्यक्ष, खासदार, आमदार व पदाधिकारी यांच्यासह ८०० जण उपस्थित राहणार आहेत. बैठकीच्या स्थळाला कामगारनगरी तर व्यासपीठाला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देण्याचे निश्‍चित केले आहे.

स्वागतासाठी फलक आणि झेंडे
शहरात होणाऱ्या भाजप बैठकीसाठी विविध भागांमध्ये मान्यवरांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत. तसेच चिंचवडगाव ते चिंचवड स्टेशन परिसरात जागोजागी झेंडे लावण्यात आले आहेत. यामुळे शहरात भाजपमय वातावरण झाले आहे.

भोजनाची जोरदार तयारी
कार्यकर्त्यांची निवास सोय शहरातील विविध तारांकित हॉटेलमध्ये केली आहे. मुख्यमंत्री पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये मुक्‍कामाला असतील. प्रदेश कार्यकारिणीच्या पहिल्या दिवशी (बुधवारी) दुपारचे आणि रात्रीचे भोजन तसेच गुरुवारी दुपारचे भोजन असे तीनवेळा भोजन होणार आहे. या भोजनात पहिल्या दिवशी मटकी आणि वांग्याची भाजी तसेच गुलाबजाम, जिलेबी, मुगाचा शिरा असा बेत ठेवण्यात आला आहे. तर गुरुवारी दुपारच्या भोजनात आमरस, पुरीचा बेत आखण्यात आला आहे.

भाजपत अंतर्गत शीतयुद्ध
केंद्रीय मंत्री, राज्य सरकारमधील मंत्री, भाजपचे आमदार-खासदार यांच्यासह ८०० पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी भाजपच्या वतीने कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी स्वागताचे फलक लावले आहेत. मात्र काही फलकांवर आमदार महेश लांडगे यांचा फोटो नसल्याने त्यांच्या समर्थकांमधून नाराजी व्यक्‍त करण्यात आली. त्यानंतर आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी लावलेल्या फलकांवर शहराध्यक्षांसह एकाही भाजपच्या स्थानिक नेत्याचा फोटो लावला नाही, यामुळे फ्लेक्‍सबाजीवरून भाजपमध्ये शीतयुद्ध सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.

पार्किंगसाठी एल्प्रोचे आवार
प्रेक्षागृहाच्या आवारात पार्किंगच्या जागी भोजनाची व्यवस्था करण्यात आली असल्याने वाहनांकरिता जवळच असलेल्या एल्प्रो कंपनीच्या आवारात जागा करण्यात आली आहे. या ठिकाणी चारशे वाहने पार्क होऊ शकतात. जर एखाद्याला आपले वाहन बोलवायचे असल्यास वॉकीटॉकीद्वारे प्रेक्षागृह ते एल्प्रो असा संवाद साधून बोलाविता येणार आहे. एल्प्रो कंपनीच्या आवारात ध्वनिक्षेपकाची व्यवस्था केली आहे. तसेच कार्यक्रमस्थळी होणारी घुसखोरी रोखण्यासाठी कार्यकर्ते व निमंत्रित यांना विशेष पास देण्यात आले आहेत.

गायनाचा कार्यक्रम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गायनाची आवड आहे. त्यांची ही आवड लक्षात घेता पिंपरी चिंचवड शहर भाजपकडून मंगळवारी सायंकाळी कार्तिकी गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित केल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.

Web Title: bjp working committee selection meeting