‘भाजयुमो’चे अांदोलन; व्यापाऱ्याकडून ७० रुपयांचे स्वाइप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 डिसेंबर 2016

पुणे - किमान हजार रुपयांच्या खरेदीशिवाय कार्ड स्वाइप न करण्याचा ‘स्वयंघोषित’ नियम करणारे व्यापारी अखेर नरमले आहेत. धायरी येथील बालाजी ट्रेडर्स या दुकानात ७० रुपयांच्या बिलाची रक्कम ‘स्वाइप’ करायला लावून भारतीय जनता युवा मोर्चाने व्यापाऱ्यांविरोधात मंगळवारी सकाळी आंदोलन केले. 

नोटाबंदीनंतर सर्वसामान्य नागरिकांकडून ‘डिजिटल पेमेंट’चा स्वीकार होत आहे. शहरातील विविध भागांत असलेल्या किराणा दुकानांमधून धान्य खरेदी करण्यासाठी गृहिणी आता डेबिट कार्डचा वापर करीत आहेत. मात्र काही व्यापाऱ्यांकडून हजार रुपयांचा माल घेतला, तरच कार्ड स्वाइप करता येईल, अशी नागरिकांची अडवणूक केली जात असल्याचे ‘सकाळ’च्या निदर्शनास आले होते. याबाबत पाहणी केल्यानंतर ‘सकाळ’मध्ये सोमवारी (ता. १३) यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दीपक पोटे यांच्या नेतृत्वाखाली धायरी येथील बालाजी ट्रेडर्स समोर मंगळवारी आंदोलन करण्यात आले. या वेळी संघटनेचे सरचिटणीस अजय भोकरे, निहाल घोडके, पुनील जोशी आदी उपस्थित होते. आंदोलनाचा भाग म्हणून सत्तर रुपयांची खरेदी करून, त्याचे बिल ‘कार्ड स्वाइप’द्वारे भरण्यात आले. आंदोलनानंतर ग्राहकांची अडवणूक न करण्याचे आश्‍वासन व्यापाऱ्यांनी दिले आहे. 

पोटे म्हणाले, ‘‘केंद्राने काळ्या पैशांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. त्याच वेळी कॅशलेस व्यवहाराचा आग्रह धरला आहे. अशा वेळी किमान हजार रुपयांच्या खरेदीचा मनमानी नियम करणे योग्य नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. ’’

Web Title: bjp yuva morcha agitation