भाजपच्या एकबोटे अधिकृत; धंगेकरांचा निर्णय दोन दिवसांत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

पुणे - तब्बल पाच तासांच्या सुनावणीनाट्यानंतर डेक्कन-जिमखाना प्रभागात (प्र. 14) भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून प्रा. ज्योत्स्ना एकबोटे असतील, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रविवारी जाहीर केले. दरम्यान, पुणे विद्यापीठ-संगमवाडी (प्र. 7) प्रभागात अपक्ष ठरलेल्या रेश्‍मा भोसले यांना भाजपपुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात येईल, असे पक्षातील सूत्रांनी रविवारी स्पष्ट केले; तर अपक्ष म्हणूनच ठरलेल्या रवींद्र धंगेकर यांना कॉंग्रेसपुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित करणार का, याकडे आता कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 

पुणे - तब्बल पाच तासांच्या सुनावणीनाट्यानंतर डेक्कन-जिमखाना प्रभागात (प्र. 14) भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून प्रा. ज्योत्स्ना एकबोटे असतील, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रविवारी जाहीर केले. दरम्यान, पुणे विद्यापीठ-संगमवाडी (प्र. 7) प्रभागात अपक्ष ठरलेल्या रेश्‍मा भोसले यांना भाजपपुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात येईल, असे पक्षातील सूत्रांनी रविवारी स्पष्ट केले; तर अपक्ष म्हणूनच ठरलेल्या रवींद्र धंगेकर यांना कॉंग्रेसपुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित करणार का, याकडे आता कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 

प्रभाग 14 मध्ये भाजपने ज्योत्स्ना सरदेशपांडे आणि प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांना उमेदवारीपत्र (एबी फॉर्म) दिले होते. नंतर एकबोटे यांची उमेदवारी अधिकृत असल्याचा एबी फॉर्म शहर भाजपने निवडणूक अधिकाऱ्यांना दिला होता. मात्र, सरदेशपांडे यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेसच्या उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रावरील स्वाक्षरी चुकीची आहे, सुधारित एबी फॉर्मवर भाजप शहराध्याक्षांची स्वाक्षरी बनावट आहे, आदी विविध प्रकारचे आक्षेप घेतल्याने शनिवारी रात्री अकरा ते पहाटे दोन वाजेपर्यंत सुनावणी झाली. त्यानंतर रविवारी सकाळी अकरा वाजता पुन्हा सुनावणी सुरू झाली ती दुपारी दीड वाजता संपली. या वेळी प्रा. ज्योत्स्ना यांचे पती डॉ. गजानन एकबोटे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे युक्तिवाद केला; तसेच सुधारित एबी फॉर्म अधिकृत असल्याचे सांगण्यासाठी शहराध्यक्ष योगेश गोगावलेही आले होते. त्यानंतर एकबोटे यांची भाजपची उमेदवारी वैध असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी सरदेशपांडे यांनी नाराजी व्यक्त केली; तर प्रा. एकबोटे यांनी पक्षाच्या निर्णयाचा मान राखण्याचे आवाहन केले. 

रेश्‍मा भोसले भाजपपुरस्कृत 
प्रभाग 7 मध्ये शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सतीश बहिरट आणि "राष्ट्रवादी'तून प्रवेश केलेल्या रेश्‍मा भोसले यांना भाजपने एबी फॉर्म दिले होते. भोसले यांनी उमेदवारी अर्ज "राष्ट्रवादी'कडून भरला होता आणि एबी फॉर्म भाजपचा होता. त्यामुळे कॉंग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट, शिवसेनेचे उमेदवार राजू पवार यांनी आक्षेप घेतला; तसेच भाजपचा सुधारित एबी फॉर्म भोसले यांच्या नावाने होता. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कमळ चिन्ह गोठविले. दोन्ही उमेदवारांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविता येईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे प्रभाग सातमध्ये भाजपचा अधिकृत उमेदवार नसेल. या प्रभागात भाजपपुरस्कृत उमेदवार म्हणून भोसले यांची निवड करण्यात येईल. बहिरट अर्ज मागे घेतील, असा विश्‍वास पक्षातील सूत्रांनी व्यक्त केला. 

कॉंग्रेसकडून धंगेकर की बागवान? 
कसबा पेठ-सोमवार पेठ प्रभागातील (क्र. 16) नागरिकांच्या मागास प्रवर्गात अस्लम बागवान, रवींद्र धंगेकर यांना कॉंग्रेसचा एबी फॉर्म मिळाला होता. त्यामुळे पक्षाने सुधारित एबी फॉर्म धंगेकर यांना दिला; परंतु तो वेळेत पोचला नाही. तत्पूर्वी धंगेकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. धंगेकर यांना कॉंग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून ऍड. राजेंद्र चिटणीस यांच्यामार्फत युक्तिवाद करण्यात आला; परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी धंगेकर यांचा सुधारित एबी फॉर्म उशिरा आल्यामुळे तो अर्ज अवैध ठरवून अपक्ष उमेदवाराचा अर्ज वैध ठरविला. त्या वेळी बागवान यांनी लेखी अर्जाद्वारे माघार घेण्याची तयारी दर्शविली. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याला नकार दिला. दरम्यान, धंगेकर यांना कॉंग्रेसपुरस्कृत करणार की बागवान निवडणुकीच्या रिंगणात राहणार, याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. 

खुल्या गटात ऍड. मोहिनी भोकरे आणि सुजाता शेट्टी यांना कॉंग्रेसने एबी फॉर्म दिले होते. मात्र, सुधारित एबी फॉर्म शेट्टी यांच्या नावाने असल्यामुळे त्यांची उमेदवारी निवडणूक अधिकाऱ्यांनी वैध ठरविली. अनुसूचित जाती गटात झुंबरबाई आरडे आणि जयश्री कांबळे यांना एबी फॉर्म कॉंग्रेसने दिला होता. छाननीत आरडे यांच्या अर्जात त्रुटी असल्याचे दिसल्यामुळे त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला; तर दोन एबी फॉर्ममुळे कांबळे यांना अपक्ष उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे या गटात कॉंग्रेसचा अधिकृत उमेदवार नसेल. खुल्या गटात नितीन परतानी यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला. 

कॉंग्रेस दोन दिवसांत निर्णय घेणार 
अप्पर सुप्पर इंदिरानगर (प्र. 37) प्रभागातील कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार विजयराव मोहिते, नवी पेठ- पर्वतीमधील (प्र. 29) संजीवनी कुरूमकर, कसबा पेठ- सोमवार पेठ प्रभागातील (प्र. 16) रवींद्र धंगेकर यांचे अर्ज बाद झाले आहेत. काही ठिकाणी दोन उमेदवारांना उमेदवारी अर्ज दिल्यामुळे तेथील उमेदवार अपक्ष म्हणून वैध ठरल्याने या प्रभागांचा येत्या दोन दिवसांत आढावा घेण्यात येईल. पक्षातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तेथील कोणत्या अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत करायचे, याचा निर्णय घेण्यात येईल, असे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले. 

Web Title: BJP's official Ekbote