अश्‍लील पोस्टच्या भीतीने तरुणींना ब्लॅकमेल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

पुणे - महिलेसह तरुणींचे इन्स्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट खाते हॅक करून, अश्‍लील पोस्ट टाकण्याची भीती दाखवून त्यांच्याकडे पैशांची मागणी करणाऱ्या तरुणास गुन्हे शाखेच्या सायबर शाखेच्या पथकाने अटक केली. आरोपीने त्याच्या ओळखीच्या मैत्रिणींनाही अशाचप्रकारे ब्लॅकमेल केल्याचे उघडकीस आले.

पुणे - महिलेसह तरुणींचे इन्स्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट खाते हॅक करून, अश्‍लील पोस्ट टाकण्याची भीती दाखवून त्यांच्याकडे पैशांची मागणी करणाऱ्या तरुणास गुन्हे शाखेच्या सायबर शाखेच्या पथकाने अटक केली. आरोपीने त्याच्या ओळखीच्या मैत्रिणींनाही अशाचप्रकारे ब्लॅकमेल केल्याचे उघडकीस आले.

कृष्णा बळीराम फड (रा. जगदीश खानावळकर चाळ, खानावळकर आळी, पनवेल, रायगड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पिंपळे सौदागर येथील एका महिलेने फिर्याद दिली होती. कृष्णाने फिर्यादी महिलेचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करून त्यावर अश्‍लील व बदनामीकारक मजकूर अपलोड केला. तो डिलीट करण्यासाठी पंधरा हजार रुपयांची मागणी केली. या प्रकरणी संबंधित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर पनवेलमधील एका तरुणाकडून हा प्रकार केला जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रूपाली पवार, मंदा नेवसे, पोलिस कर्मचारी उमा पालवे, ज्योती दिवाणे, शाहरुख शेख, योगेश वाव्हळ यांच्या पथकाने सापळा रचून फड यास ताब्यात घेतले.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत फड याने त्याच्याच ओळखीच्या ग्रुपमधील इतर सहा मुलींना अशाचप्रकारे धमकावून पैशांची मागणी केली होती, असे समोर आले. या सहा तरुणींपैकी दोघींनी सायबर शाखेकडे याविषयी तक्रार अर्ज दाखल केला होता.

या स्वरूपाच्या आत्तापर्यंतच्या घटना
* 2017 मधील तक्रार अर्ज - 606
* चौकशी पूर्ण झालेले अर्ज - 214

* 2018 मधील तक्रार अर्ज - 189
* चौकशी पूर्ण झालेले अर्ज - 62

महिलांनी त्वरित संपर्क साधावा
अशाप्रकारचे बदनामीकारक मजकूर सोशल नेटवर्किंग साइट्‌सवर अपलोड करून ब्लॅकमेल केले जात असल्यास, पैशांची मागणी केली जात असल्यास महिला व तरुणींनी त्वरित गुन्हे शाखेच्या सायबर शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: Blackmail to teenage girls due to pornography crime