रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार करणारे गजाआड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

रेल्वेच्या एक्‍स्प्रेस गाड्यांचे अनधिकृतरीत्या आगाऊ तिकिटे काढून, त्यांची जादा दराने विक्री करणाऱ्या 16 एजंटांना रेल्वे पोलिसांनी (आरपीएफ) ताब्यात घेतले आहे. अनधिकृत एजंटांविरोधात रेल्वे पोलिसांनी राबवलेल्या "ऑपरेशन धनुष्य' या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. त्यात 16 एजंटांना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून 10 लाख 57 हजार 978 रुपयांची 358 तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.

पुणे : रेल्वेच्या एक्‍स्प्रेस गाड्यांचे अनधिकृतरीत्या आगाऊ तिकिटे काढून, त्यांची जादा दराने विक्री करणाऱ्या 16 एजंटांना रेल्वे पोलिसांनी (आरपीएफ) ताब्यात घेतले आहे. अनधिकृत एजंटांविरोधात रेल्वे पोलिसांनी राबवलेल्या "ऑपरेशन धनुष्य' या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. त्यात 16 एजंटांना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून 10 लाख 57 हजार 978 रुपयांची 358 तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.

सुट्टीकाळात रेल्वेची तिकिटे मिळवण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरू असते. सुट्टी आणि उत्सवाच्या काळात "आयआरसीटीसी'च्या संकेतस्थळावरुन तिकीट काढताना प्रतीक्षा यादीचा सामना करावा लागतो. त्यात रेल्वेने संकेतस्थळावर तिकीट विक्री सुरू केल्यानंतर अवघ्या काही सेकंदामध्ये सर्व तिकिटे विकली जातात. या कालावधीत एजंटाकडून खोट्या (फेक) आयडीच्या आधारे तिकिटे बुक करण्यात येत असल्याने तिकिटांचा कोटा लवकर संपतो. त्यामुळे सर्वसामान्यांना तिकीट मिळणे अवघड जाते.

याचा फायदा घेत हे एजंट अधिकच्या दराने तिकिटांची विक्री करतात. यातून प्रवाशांची मोठी लूट होते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी रेल्वे पोलिसांनी 26 ऑक्‍टोबर ते 4 नोव्हेंबर या कालावधीत एजंटांविरोधात "ऑपरेशन धनुष्य' ही मोहीम राबवली. यात पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली या शहरांतील विविध भागात धाड टाकून एजंटांना पकडण्यात आले. त्यांच्यावर रेल्वे अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Blackmailer of e-ticket in railway was arrested