राजशिष्टाचार भंगाचे खापर जावडेकरांवर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

पुणे : माता रमाबाई आंबेडकर यांच्या पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमात झालेल्या राजशिष्टाचारभंगाचे खापर महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर फोडल्याचे समोर आले आहे. त्यांनी सांगितल्यामुळे नियोजित कार्यक्रमात नसतानाही ऐनवेळी आभार मानले, असे महापालिकेकडून करण्यात आलेल्या खुलाशात म्हटले आहे. 

पुणे : माता रमाबाई आंबेडकर यांच्या पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमात झालेल्या राजशिष्टाचारभंगाचे खापर महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर फोडल्याचे समोर आले आहे. त्यांनी सांगितल्यामुळे नियोजित कार्यक्रमात नसतानाही ऐनवेळी आभार मानले, असे महापालिकेकडून करण्यात आलेल्या खुलाशात म्हटले आहे. 

वाडिया कॉलेज येथील उद्यानातील माता रमाबाई आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नुकतेच झाले. या कार्यक्रमात महापालिकेकडून राजशिष्टाचाराचा भंग झाला होता. त्यावर राष्ट्रपती कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनाकडे विचारणा झाली होती. जिल्हा प्रशासनाने या संदर्भात महापालिकेला नोटीस बजावून खुलासा मागितला होता. याबाबतचे वृत्त सर्वप्रथम "सकाळ'ने दिले होते. त्यावर महापालिकेने खुलासा केला आहे. 

या कार्यक्रमात व्यासपीठावर कोण पदाधिकारी बसणार, हे राष्ट्रपती यांच्या कार्यालयाकडून निश्‍चित होते. असे असताना ऐनवेळी उपमहापौर यांना खुर्ची देण्यात आली. तसेच, नियोजित कार्यक्रमात आभार मानणे हेदेखील नव्हते. असे असताना उपमहापौर यांनी ऐनवेळी आभार मानले. तसेच कार्यक्रम संपल्यानंतर राष्ट्रपतींना व्यासपीठावरून खाली घेऊन छायाचित्र काढण्यात आल्याने राजशिष्टाचाराचा भंग झाला असल्याचे राष्ट्रपती कार्यालयाकडून कळविण्यात आले होते. त्यावर खुलासा करताना ऐनवेळी व्यासपीठावर खुर्ची देण्यात आल्यामुळे उपमहापौर त्यात बसले. तसेच जावडेकर यांनी आभार मानण्याची सूचना दिल्यामुळे आभार मानण्यात आल्याचे महापालिकेने खुलाशात म्हटले आहे. 

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना वाहतूक कोंडीमुळे कार्यक्रमाला येण्यास उशीर झाला, असे कारण पुढे करण्यात आले आहे. महापालिकेकडून प्राप्त झालेला हा खुलासा जिल्हा प्रशासनाकडून राष्ट्रपती कार्यालयास पाठविण्यात आला आहे. त्यावर राष्ट्रपती कार्यालयाकडून महापालिकेवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

चुकांबद्दल दिलगिरी 
महापालिकेने पाठविलेल्या या खुलाशात झालेल्या चुकांबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. तर, जिल्हा प्रशासनानेही झालेल्या चुकांबद्दल महापालिकेने दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच यापुढे त्यांच्याकडून अशा प्रकाराच्या कोणत्याही चुका होणार नाहीत, अशी समज त्यांना देण्यात आली असल्याचे राष्ट्रपती कार्यालयास कळविले असल्याचे समजते. 
 

Web Title: blame on javdekar for voilation president protocol