रंगभूमीच्या आशीर्वादाने कामात हुरूप - प्रशांत दामले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

पूर्वीची नेते मंडळी रंगभूमीशी निगडित असायची. प्रत्येकजण आवर्जून नाटक पाहायला यायचे. राज्यकर्ते आणि कलाकारांचा एक वेगळाच बंध निर्माण झाला होता. पण काळ बदलताना राज्यकर्ते रंगभूमीशी तुटल्यासारखे दिसतील. त्यामुळे रंगभूमीला जाणवणाऱ्या अडचणी त्यांच्यापर्यंत पोचविणे कठीण झाले आहे. 
- प्रशांत दामले, अभिनेता 

पुणे - ""गेल्या 35 वर्षांपासून रंगभूमीवर यशस्वी कारकीर्द सुरू आहे. या प्रवासात रंगकर्मी, दिग्दर्शक आणि रसिकांची मोलाची साथ मिळाली, मी त्यांचा आभारी आहे. रंगभूमीने प्रेम आणि आनंद दिला. याच आशीर्वादाने काम करण्याचा हुरूप जिवंत आहे. रंगभूमीशी जुळलेले बंध आयुष्यभर कायम राहतील,'' अशी भावना अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केली. 

"उत्कर्ष नागरी विकास संस्थे'तर्फे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिला जाणारा "साहेब पुरस्कार' दामले यांना पत्रकार अनंत दीक्षित यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महापौर प्रशांत जगताप, संस्थेचे अध्यक्ष सुरेश बांदल, उपाध्यक्ष गणेश नलावडे, कार्याध्यक्ष किरण कद्रे आणि योगिनी कांचन उपस्थित होते. या वेळी दामले आणि सहकाऱ्यांनी "साखर खाल्लेला माणूस' या नाटकाचा प्रयोग सादर केला. 

दामले म्हणाले, ""मालिकेत काम केल्यामुळे आपली आर्थिक गणिते सांभाळता येतात. पण रंगभूमीवर काम केल्याने मानसिक आनंद मिळतो. त्यामुळे मी अजूनही रंगभूमीवर टिकून आहे. रसिकांच्या प्रतिसादामुळेच माझ्या नाटकांचे प्रयोग अविरतपणे सुरू आहेत. अभिनय हे आपल्या कलेने समृद्ध करायचे असते. अभिनयासाठी भाषेची समृद्धी आणि स्वच्छ आवाज लागतो. हेच गुण मी नवोदित कलाकारांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न करत आहे.'' 

जगताप म्हणाले, ""अनेक राज्यकर्त्यांनी सांस्कृतिक चळवळ पुढे नेण्यात योगदान दिले. त्यात शरद पवार यांचे योगदान मोठे आहे. इतर राज्यात बहुआयामी नेत्यांच्या मागे कार्यकर्ते उभे राहतात, तसे आपल्या राज्यात होत नाही. एकमुखी पद्धतीने नेत्याच्या पाठीशी उभे राहणाऱ्या कायकर्त्यांची आपल्याकडे कमतरता आहे. कायदे मंडळात 50 वर्ष कार्यरत असलेल्या बहुआयामी नेत्यांच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे.'' 

Web Title: The blessing of the theater work - damle