स्मार्ट काठी दाखविणार अंध व्यक्तींना रस्ता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

पुणे - निसर्गाने अंधत्व लादले, तरी अंधांची उमेद खचलेली नसते. एका काठीचा आधार घेत त्यांचा संघर्ष सुरू असतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ही काठी ‘स्मार्ट’ बनविली आहे. सहा फूट अंतरावरील अडथळ्याची सूचना ही काठी देईलच. पण आजूबाजूला कोण आहे, हेदेखील ती सांगेल.

पुणे - निसर्गाने अंधत्व लादले, तरी अंधांची उमेद खचलेली नसते. एका काठीचा आधार घेत त्यांचा संघर्ष सुरू असतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ही काठी ‘स्मार्ट’ बनविली आहे. सहा फूट अंतरावरील अडथळ्याची सूचना ही काठी देईलच. पण आजूबाजूला कोण आहे, हेदेखील ती सांगेल.

अंध व्यक्ती रस्त्याने चालताना त्यांना अडथळ्यांची कल्पना येतेच असे नाही. छोटी पायरी किंवा दगड त्यांना इजा करू शकतो. हा धोका विद्यापीठातील इलेक्‍ट्रॉनिक्‍स विभागाने विकसित केलेल्या काठीमुळे दूर होईल. विभागप्रमुख डॉ. अरविंद शाळिग्राम आणि प्रकल्प सहायक समता आढाव यांनी त्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले आहे. आढाव याबद्दल म्हणाल्या, ‘‘स्मार्ट काठीमध्ये ‘अल्ट्रासॉनिक सेन्सर’ आणि ‘मायक्रो कंट्रोलर’ बसविले आहेत. यामुळे सहा फुटांवरील कोणताही अडथळा अंधांना आधीच समजू शकेल. त्यासाठी ‘बझर’ आणि ‘व्हायब्रेटर’ही त्यात आहेत. वेगवेगळ्या दिशांसाठी बझरचे आवाज वेगळे असतील. अंध व्यक्‍ती आसपास असल्याचे ‘बझर’मुळे अन्य लोकांनादेखील समजेल.’’

स्मार्ट काठी या तंत्रज्ञानाचे पेटंट घेणार असल्याचे सांगताना डॉ. शाळिग्राम म्हणाले, ‘‘विद्यापीठातील डिझाइन इनोव्हेशन सेंटरअंतर्गत हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. पाच महिन्यांपासून त्यावर संशोधन सुरू होते. ते पूर्ण झाले असून, दोन महिन्यात पेटंटसाठी प्रक्रिया सुरू होईल. नंतर हे तंत्रज्ञान उद्योगांमार्फत उत्पादन रूपात बाजारात येईल. या काठीची किंमत सामान्य अंध व्यक्तीला परवडू शकेल, एवढी कमी असेल.’’

‘बोलके’ कॅमेरे
अंधांची काठी केवळ अडथळ्यांचे संदेश देण्यापुरती मर्यादित राहणार नाही. त्यात आणखी मूल्यवर्धन केले जाणार आहे. यात छोटे कॅमेरे बसविले जाणार आहेत. ते आजूबाजूची छायाचित्रे टिपून समोर भिंत, प्राणी, पायऱ्या किंवा काय आहे, याची माहिती आवाजाद्वारे अंध व्यक्‍तीपर्यंत पोचवतील, असेही डॉ. शाळिग्राम यांनी सांगितले.

संशोधनाचा फायदा समाजाला झाला पाहिजे, हा हेतू समोर ठेवूनच विद्यापीठात संशोधन कार्य सुरू असते. अंधांना रस्ता दाखविणारी काठी हा त्याचाच भाग आहे. या संशोधनाचे काम पूर्ण झाले आहे. आता उद्योगांच्या मदतीने हे तंत्रज्ञान अंधांसाठी बाजारात आणण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न असेल.
- डॉ. वासुदेव गाडे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: Blind persons smart staff