अंध प्राध्यापकाने उघडले विमान कंपन्यांचे डोळे 

अंध प्राध्यापकाने उघडले विमान कंपन्यांचे डोळे 

पुणे - अपंगांचे मानवाधिकार या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निघालेल्या एका अंध प्राध्यापकाला विमानतळावर पोचण्यापूर्वीच अंधांच्या अधिकारांसाठी संघर्ष करण्याची वेळ आली. सुदैवाने या संघर्षाला अनुकूल प्रतिसाद मिळाला; मात्र आता जेट एअरवेज टॉप मॅनेजमेंट त्यांचा शब्द पाळणार का, याकडे लक्ष लागले आहे. 

शहरातील "आयएलएस' विधी महाविद्यालयात गेल्या 21 वर्षांपासून भारतीय संविधान हा विषय शिकविणाऱ्या डॉ. संजय जैन यांना अंधांच्या अधिकारांसाठी पंतप्रधान कार्यालय, विमान वाहतूक प्राधिकरणापासून केंद्रीय मंत्र्यांना साकडे घालावे लागले, तेव्हा कोठे "जेट'चे व्यवस्थापन नरमले. जैन यांना अपंगांचे मानवाधिकार या विषयावरील परिषदेसाठी ऍमस्टरडॅमजवळील मास्टरिक शहरात जायचे आहे. त्यासाठी त्यांनी गोईबीबो संकेतस्थळावरून विमानाचे तिकीट आरक्षित केले. जेट आणि नेदरलॅंडची "केएलएम' या कंपनीकडून त्या मार्गावर विमान धावते. तिकिट हातात आल्यावर ऍमस्टरडॅम ते मास्टरिक दरम्यान तीन तासांचा प्रवास विमानाऐवजी बसने करायचा आहे, असे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे जैन यांनी जेट, केएलएम विमान कंपन्यांशी संपर्क साधला. "ऍमस्टरडॅम विमानतळावरून मास्टरिकला जाण्यासाठी बसमध्ये बसण्यास मदत करा, कारण मी दोन्ही डोळ्यांनी अंध आहे,' अशी विनंती त्यांनी केली. तेव्हा दोन्ही विमान कंपन्यांनी त्यांची विनंती साफ फेटाळली. जैन यांनी गोईबीबोशी संपर्क साधला तेव्हा त्यांनीही हात वर केले. त्यानंतर जैन यांनी पंतप्रधान कार्यालय, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक, केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे तक्रार केली. जेटकडेही वारंवार तक्रार केली. त्यानंतर पाठपुरावा केला. अखेर त्यांना सोमवारी (ता. 15) जेट एअरवेजकडून "बसमध्ये बसविण्यास मदत करू', असे आश्‍वासन देण्यात आले. परंतु त्या बाबत ई-मेलद्वारे लेखी होकार देण्यास त्यांनी असमर्थता व्यक्त केली. 

दोन्ही डोळ्यांनी अंध आहे, असे सांगूनही विमान कंपन्या प्रतिसाद देत नाहीत, हा अनुभव अचंबित करणारा आहे. ऍमस्टरडॅममध्ये सर्व पाट्या डच भाषेत आहेत. केएलएम कंपनीनेच बसचे आरक्षण केले. त्यामुळे अंध प्रवाशाला बसमध्ये बसविण्यासाठी मदत करणे, त्यांना बंधनकारकच आहे. जेट एअरवेज त्यांचे पार्टनर आहेत. त्यामुळे त्यांचीही जबाबदारी आहे. परंतु ते सर्रास उडवून लावतात. आता 24 ऑक्‍टोबरला ते आपला शब्द पाळतात का, ते बघू. 
डॉ. संजय जैन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com