दृष्टिहीन साक्षीचे ‘डोळस’ यश

Sakshi-Amrutkar
Sakshi-Amrutkar

पुस्तके ऐकून मिळविले ९२ टक्के गुण; ‘सीए’ होण्याचे स्वप्न
पुणे - ‘बारावीची परीक्षा म्हटलं की दडपण येतं. परंतु, वर्षाच्या सुरवातीपासून सातत्याने अभ्यास केल्यास परीक्षा ही अवघड वाटतच नाही,’’ असे आत्मविश्‍वासाने सांगत शंभर टक्के दृष्टिहीन असणाऱ्या साक्षी अमृतकर हिने आपल्या यशाचे गमक उलगडले. आळंदी येथील एमआयटी कनिष्ठ महाविद्यालयातील साक्षीने पुस्तके वाचत नव्हे, तर दुसऱ्याकडून ऐकत स्मरणाच्या बळावर बारावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळविले आहेत. वाणिज्य शाखेत शिकणारी साक्षी ९२ टक्के गुणांसह महाविद्यालयात पहिली आली आहे. 

‘परीक्षेची तयारी करताना तिचे आई-वडील तिला पुस्तके वाचून दाखवायचे आणि त्यातून ती अभ्यास करायची. अभ्यासक्रमातील काही पुस्तके तिला ब्रेल लिपीत उपलब्ध झाली, त्यामुळे अभ्यास करणे अधिक सोपे झाले. वडील विशेषत: अकाउंट्‌स आणि इंग्रजीचा अभ्यास घ्यायचे. त्याचबरोबर काही विषयांचा अभ्यास ध्वनिफितीद्वारे (ऑडिओ) केला,’’ असेही साक्षीने सांगितले. साक्षीला आता सनदी लेखापाल (सीए) होण्याचे स्वप्न खुणावू लागले आहे. त्यासाठी तिने तयारीदेखील सुरू केली आहे. परंतु, सीए होण्यासाठी आवश्‍यक अभ्यासक्रमाची पुस्तके ब्रेल लिपीत नसल्याने तिच्यासमोर यक्षप्रश्‍न उभा राहिला आहे.

‘साक्षी सुरवातीपासूनच अभ्यास करायची, त्यामुळे तिला परीक्षेचे दडपण कधी आले नाही. दहावीमध्ये तिला ८७ टक्के गुण होते. बारावीमध्ये तिला चांगले गुण मिळतील, 

अशी अपेक्षा होती. तिला परीक्षेसाठी राजश्री आढाव ही ‘रायटर’ महाविद्यालयातर्फेच देण्यात आली होती. तिचेही चांगले सहकार्य साक्षीला मिळाले,’’ असे साक्षीच्या आई उमा अमृतकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com