रक्तदानातून मानवतेचा सेतू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जुलै 2018

शिरूर - थॅलेसेमियाग्रस्त मुलांची रक्ताची गरज लक्षात घेऊन त्यांच्यासाठी कायमस्वरूपी रक्तदान शिबिरे घेण्याचा संकल्प रांजणगाव एमआयडीसीतील ‘फियाट’ कंपनीतील कामगारांनी केला. कंपनीच्या आरोग्य जनजागृती उपक्रमांतर्गत गेल्या दोन वर्षांत पन्नास शिबिरे झाली असून, सुमारे दोन हजार पाचशे कामगारांनी रक्तदान केले आहे.

शिरूर - थॅलेसेमियाग्रस्त मुलांची रक्ताची गरज लक्षात घेऊन त्यांच्यासाठी कायमस्वरूपी रक्तदान शिबिरे घेण्याचा संकल्प रांजणगाव एमआयडीसीतील ‘फियाट’ कंपनीतील कामगारांनी केला. कंपनीच्या आरोग्य जनजागृती उपक्रमांतर्गत गेल्या दोन वर्षांत पन्नास शिबिरे झाली असून, सुमारे दोन हजार पाचशे कामगारांनी रक्तदान केले आहे.

‘फियाट’मध्ये शुक्रवारी झालेल्या स्नेहसंमेलनात कामगारांनी हा संकल्प केला. या वेळी कामगारांच्या कुटुंबीयांबरोबरच; पुणे व परिसरातील थॅलेसेमियाग्रस्त मुले पालकांसमवेत उपस्थित होते. ‘फियाट इंडिया ॲटोमोबाइल्स प्रायव्हेट लिमिटेड’चे अध्यक्ष रवी गोगिया, वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश बवेजा व एच. के. द्विवेदी, उपाध्यक्ष आकाश मित्तल यांच्यासह या उपक्रमात योगदान देणारे ‘इंडियन रेडक्रॉस सोसायटी’च्या पुणे जिल्हा शाखेचे सचिव प्रा. आर. व्ही. कुलकर्णी, ‘जनकल्याण रक्तपेढी’च्या वैद्यकीय अधिकारी तन्वी यार्दी, रक्तपेढीचे प्रतिनिधी रवी कुलकर्णी, ‘थॅलसेमिया सोसायटी’चे प्रतिनिधी जतिन शेषपाल, शुभदा देशपांडे उपस्थित होते.

थॅलसेमियाच्या तपासणीसाठी कंपनीमार्फत लवकरच ‘स्क्रिनिंग’ची सुविधा उपलब्ध केली जाणार असल्याचे व थॅलसेमियाच्या उच्चाटनासाठी विविध उपक्रम हाती घेत असल्याचे रवी गोगिया यांनी जाहीर केले.  

कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश बवेजा यांनी या उपक्रमाची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत गेल्या दोन वर्षांपासून महिन्यातून दोनदा रक्तदान शिबिर घेतले जाते. जनकल्याण रक्तपेढीमार्फत जमा केलेले हे रक्‍त ‘थॅलसेमिया सोसायटी’मार्फत पुण्यात विविध संस्थांतून सांभाळ केल्या जाणाऱ्या थॅलसेमियाग्रस्त मुलांना दिले जाते. प्रत्येक वेळच्या शिबिरात पन्नास कर्मचारी रक्तदान करतात. त्यानुसार आत्तापर्यंत जवळपास अडीच हजार कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले आहे.’’

तब्बल ९७ वेळा रक्तदान
आत्तापर्यंत झालेल्या रक्तदान शिबिरात तीन किंवा त्याहून अधिक वेळा रक्तदान केलेल्या कर्मचाऱ्यांचा या वेळी कंपनीतर्फे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आत्तापर्यंत तब्बल ९७ वेळा रक्तदान करणारे कर्मचारी समीर आजगावकर यांचाही या वेळी अधिकाऱ्यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. थॅलसेमियाग्रस्त मुलांनी या वेळी ‘झिंग झिंग झिंगाट’ या गाण्यावर नृत्य सादर केले. त्या वेळी सर्वांनीच त्यांना टाळ्यांनी दाद दिली.

Web Title: blood donation camp humanity