पुण्यात रक्ताचा तुटवडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

blood
पुण्यात रक्ताचा तुटवडा

पुण्यात रक्ताचा तुटवडा

खडकी : राज्यासह पुण्यात कोरोना संसर्गाचा प्रभाव कमी होत असल्याचे दिसत असताना दुसरीकडे मात्र रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याचे समोर आले आहे. पुण्यातील बहुतांश रक्तपेढ्यांमध्ये पाच ते सात दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक असल्याची माहिती पुण्यातील जुनी रक्तपेढी असलेली जनकल्याण रक्तपेढीचे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांनी दिली.

कोरोना काळात रक्तापेक्षा प्लाझ्मा गोळा करण्याचे आव्हान होते. मात्र आता कोरोनाचा प्रसार ओसरत असताना इतर आजाराच्या रुग्णांसाठी रक्ताची मागणी वाढली आहे. त्यामुळे रक्त संकलनाचे मोठे आव्हान रक्तपेढ्यांसमोर उभे ठाकले आहे. दरम्यान, रक्तदान शिबिर, आयटी कंपन्या, औद्योगिक ठिकाणे तसेच समाजिक संस्थांच्या माध्यमातून रक्तपेढ्या ८० टक्के रक्त संकलन करतात, तर रक्तपेढीतून रक्तदात्यांना दूरध्वनी करून २० टक्के रक्त संकलित केले जाते. मात्र कोरोनाच्या प्रभावामुळे हे प्रमाण कमी झाले आहे. वर्क फ्रॉम होममुळे या माध्यमातून रक्त संकलन बंद झाले. शिवाय कोरोनाच्या भीतीमुळे अनेक जण रक्तदान करण्यास घाबरत असल्याने रक्तदात्यांचे प्रमाण घटले आहे, अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.

मित्र परिवार फाउंडेशनचे शिबिर संयोजक दिनेश शाह म्हणाले, कोरोनाचा काळ आणि सध्या रक्तदान शिबिरांचे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या आम्ही विविध सोसायट्यांत रक्तदान शिबिरे घेत असून नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करत आहोत. खासगी रुग्णालयातून दररोज रक्ताची मागणी होत आहे. दरम्यान, काही रुग्णालये रक्त पिशवी न मागता रक्तदाता मागत आहेत. त्यामुळे रक्तपेढीत रक्त संकलनाचे प्रमाण कमी होत आहे.

रक्तपेढीचे काम कसे चालते?

रक्त संकलित केल्यानंतर त्यातील लाल पेशी, प्लेटलेट व प्लाझ्मा अशा घटकांचे विभाजन केले जाते. त्यानुसार त्यांना विविध अंश डिग्रीमध्ये प्रीझर्व केले जाते. तसेच त्या त्या घटकांचा टिकण्याचा कालावधी वेगळा असतो. त्यामुळे गरजेप्रमाणे रक्त घटक पुरवावे लागतात. थॅलेसेमिया या दुर्धर अनुवांशिक आजरासाठी लागणाऱ्या लाल रक्त पेशीच्या घटकांचा वर्षभरात २०० ते ३०० रक्त बाटल्यांचा मोफत पुरवठा या रक्तपेढीकडून केला जातो.

सरकारी रक्तपेढ्यांचीदेखील हीच स्थिती आहे. रक्ताची मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाला आहे. कोरोना काळात राहिलेल्या शस्त्रक्रियांसाठी रक्ताची मागणी वाढताना दिसत आहे. ससून रुग्णालयाच्या वतीने महाविद्यालय, विद्यापीठ, आयटी कंपनीत दर आठवड्याला कॅम्प होत होते. किमान ५०० बाटल्या रक्त संकलन होत होते. लसीकरण झाल्यावर तीन आठवड्यांनी तुम्ही रक्तदान करू शकता. रक्तदान सुरक्षित असून, रक्तदानासाठी नागरिकांनी न घाबरता पुढे आले पाहिजे.

- डॉ. लीना नकाते, रक्तपेढी प्रमुख, ससून रुग्णालय

loading image
go to top