शिक्षण मंडळ होणार जून महिन्यात बरखास्त

दीपेश सुराणा
शुक्रवार, 17 मार्च 2017

पिंपरी - नगरपालिका असल्यापासून गेली ३८ वर्षे अस्तित्वात असलेले शिक्षण मंडळ जून महिन्यात बरखास्त होणार आहे. पर्यायाने राजकीय कार्यकर्त्यांना महापालिकेत पद देऊन सामावून घेण्याचा एक मार्ग बंद होणार आहे. जून महिन्यानंतर शिक्षण मंडळाचे सर्व अधिकार महापालिका आयुक्तांकडे हस्तांतरित होतील. महापालिकेच्या अखत्यारित शिक्षण समिती गठित होऊन कार्यवाही होईल. त्यामुळे निवृत्ती शिंदे हे शिक्षण मंडळाचे शेवटचे सभापती ठरणार आहेत.

पिंपरी - नगरपालिका असल्यापासून गेली ३८ वर्षे अस्तित्वात असलेले शिक्षण मंडळ जून महिन्यात बरखास्त होणार आहे. पर्यायाने राजकीय कार्यकर्त्यांना महापालिकेत पद देऊन सामावून घेण्याचा एक मार्ग बंद होणार आहे. जून महिन्यानंतर शिक्षण मंडळाचे सर्व अधिकार महापालिका आयुक्तांकडे हस्तांतरित होतील. महापालिकेच्या अखत्यारित शिक्षण समिती गठित होऊन कार्यवाही होईल. त्यामुळे निवृत्ती शिंदे हे शिक्षण मंडळाचे शेवटचे सभापती ठरणार आहेत.

पिंपरी-चिंचवड नगरपालिका असताना शिक्षण मंडळाचे पहिले सभापती म्हणून शहाजी वाघेरे यांना मान मिळाला होता. ते १७ मे १९७९ ला सभापती झाले. तर, नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर पहिले सभापती होण्याचा मान रवी खन्ना यांना १९८४ मध्ये मिळाला. आत्तापर्यंत शिक्षण मंडळावर एकूण ३१ सभापती झाले. त्यातील शेवटचे म्हणजेच ३१ वे सभापती हे निवृत्ती शिंदे ठरणार आहेत.

राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २०१३ मध्ये पारित केलेल्या अध्यादेशानुसार शिक्षण मंडळ बरखास्त करण्याचे निर्देश आहेत. या निर्णयाच्या विरोधात शिक्षण मंडळाचे तत्कालीन सभापती विजय लोखंडे आणि सदस्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने संबंधित शिक्षण मंडळ सदस्य त्यांचा कालावधी असेपर्यंत कार्यान्वित राहतील, असे स्पष्ट केले. त्यानुसार, राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन महानगरपालिका शिक्षण मंडळ कायम ठेवले. शिक्षण मंडळाच्या १० सदस्यांची नेमणूक करण्याचा ठराव महानगरपालिका सर्वसाधारण सभेत १९ मे २०१२ ला संमत झाला. तर, प्रत्यक्ष राजपत्रात या सदस्यांची नावे २ जूनला प्रसिद्ध झाली. राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून शिक्षण मंडळ सदस्यांचा पुढील पाच वर्षांचा कालावधी गृहीत धरला जाणार आहे. त्यानुसार जून २०१७ मध्ये मंडळ सदस्यांचा कालावधी संपुष्टात येतो.

शिक्षण मंडळ सदस्यांची राजपत्रात नावे प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून मंडळ सदस्यांचा कालावधी पकडला जातो. त्यानुसार शिक्षण मंडळ सदस्य त्यांची मुदत संपेपर्यंत कार्यान्वित राहतील. मुदत संपल्यानंतर महापालिकेच्या अखत्यारित शिक्षण समिती अस्तित्वात येईल. तसेच, शिक्षण मंडळ अर्थसंकल्पाचा महापालिका अर्थसंकल्पात समावेश केला जाईल.
- दिनेश वाघमारे, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

शिक्षण मंडळाची मुदत संपल्यानंतर मंडळ बरखास्त करण्याऐवजी ते पुन्हा कार्यान्वित करून कार्यकर्त्यांना संधी दिली जायला हवी, असे माझे प्रामाणिक मत आहे. राज्य सरकारने त्याबाबत विचार केला पाहिजे.
- निवृत्ती शिंदे, सभापती, शिक्षण मंडळ. 

शिक्षण मंडळ सदस्यांची मुदत संपेपर्यंत ते कार्यान्वित राहतील. राज्य सरकारचे आदेश अथवा मुंबई उच्च न्यायालयाचे जे निर्देश मिळतील त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
- बी. एस. आवारी,  प्रशासन अधिकारी, शिक्षण मंडळ.

 शिक्षण मंडळाच्या अखत्यारितील प्राथमिक शाळा (माध्यम निहाय) : मराठी- १११, हिंदी- ३, उर्दू- १२, इंग्रजी- २.
 एकूण विद्यार्थी (पटसंख्येनुसार) : ३७ हजार ६६४
 शिक्षक : ११६३
 शिक्षण मंडळाचा अर्थसंकल्प (२०१७-१८) : १५१ कोटी ५ लाख.

बरखास्तीनंतर काय होणार कार्यवाही ?
 शिक्षण मंडळ अर्थसंकल्पाचा महापालिका अर्थसंकल्पात होणार समावेश
 महापालिकेच्या सर्व प्राथमिक शाळांचा कारभार आयुक्तांच्या अखत्यारित चालणार
 महानगरपालिकेत होणार नवीन शिक्षण समितीचे गठण
 शिक्षण मंडळाच्या अखत्यारितील प्राथमिक विभाग महापालिका माध्यमिक विभागाशी जोडला जाणार
 महानगरपालिका शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सेवा महापालिकेकडे होणार वर्ग
 शिक्षण मंडळाकडील स्थावर व जंगम मालमत्ता होणार महापालिकेकडे वर्ग

Web Title: The Board of Education will be dismissed in June