डोर्लेवाडीत बेपत्ता विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला विहिरीत

सोमनाथ भिले
शनिवार, 22 डिसेंबर 2018

डोर्लेवाडी : डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील माध्यमिक विद्यालयातून काल (ता.२१) पासून बेपत्ता झालेल्या इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेशेजारीच असणाऱ्या सरकारी विहिरीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

डोर्लेवाडी : डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील माध्यमिक विद्यालयातून काल (ता.२१) पासून बेपत्ता झालेल्या इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेशेजारीच असणाऱ्या सरकारी विहिरीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

कोमल हनुमंत जाधव (रा.झारगडवाडी, ता.बारामती) असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. बारामती शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी (ता.२१) रोजी कोमल ही नेहमीप्रमाणे शाळेत आली होती. शाळेचा पहिला तास झाल्यानंतर सकाळी साडेअकराच्या दरम्यान भावाला भेटायला जायचे आहे म्हणून आपल्या मैत्रीणीसोबत वर्गशिक्षिका यांना सांगून शाळेबाहेर पडली. त्यानंतर काही वेळाने शिक्षकांनी विद्यार्थिनीच्या पालकांना मुलगी शाळेतून घरी आल्याचे सांगितले. मात्र, मुलगी घरी न परतल्यामुळे पालकाने व नातेवाईकांनी तिचा परिसरात शोध घेतला. मात्र, ती कुठेही आढळून न आल्याने त्यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, आज शनिवारी मुलीचे पालक व नातेवाईकांनी कोमलचा पुन्हा शोध सुरू केला असता हायस्कूलशेजारी असणाऱ्या सरकारी विहिरीमध्ये कोमलची चप्पल आढळून आली. त्यानंतर विहिरीत शोधाशोध केली असता विहिरीत खोल पाण्यात तिचा मृतदेह आढळून आला. या सर्व प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, आत्महत्या की हत्या याबाबत आज दिवसभर चर्चेला उधाण आले होते. याबाबत बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक निलेश अपसुंदे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: The body of the missing schoolgirl was found in Dorlewadi well