फ्लॅट लाटण्यासाठी बनावट मृत्युपत्र

Crime
Crime

पुणे - मृत व्यक्तीच्या नावाने बनावट मृत्युपत्र बनवून तिघांनी त्यांच्या सदनिकेसह अन्य मिळकत लाटण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, एक जण अद्याप फरारी आहे.   

अमोल रामचंद्र जाधव (रा. आयडियल कॉलनी, कोथरूड), डॉ. विश्‍वास बिनवडे व सचिन फोलाने, अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहे. जाधव व डॉ. बिनवडे यांना पोलिसांनी अटक केली, तर फोलाने अद्याप फरारी आहे. 

याप्रकरणी मुकुंद मधुकर भावे (वय ६८, रा. बावधन) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक संदीप बुवा यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे काका गोविंद रामचंद्र भावे व काकू गीता गोविंद भावे हे दोघेही डहाणूकर कॉलनीमधील मेघरंजनी सोसायटीतील सदनिकेमध्ये राहात होते. गोविंद यांचे २००१ मध्ये, तर गीता यांचे डिसेंबर २०१७ मध्ये निधन झाले. त्यामुळे भावे यांची सदनिका, कार्यालय व सर्व वस्तूंचा कायदेशीर वारसहक्क गोविंद यांचे बंधू व फिर्यादी यांचे काका नारायण रामचंद्र भावे यांच्याकडे आला. त्यानुसार फिर्यादी व त्यांच्या नातेवाइकांची तीन कुटुंबे संबंधित सदनिकेत राहात होते. 

न्यायालयाच्या आदेशानंतर फिर्यादीचे काका नारायण भावे यांची कायदेशीर वारस म्हणून नोंद झाली. दरम्यान, २७ ऑक्‍टोबर २०१८ या दिवशी त्यांच्या सदनिकेला अनोळखी व्यक्तीने कुलूप लावले. याबाबत फिर्यादीने अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार केली. फिर्यादीने माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मिळविल्यानंतर अमोल जाधव, सचिन फोलाने व डॉ. बिनवडे यांनी गीता भावे यांचे बनावट मृत्युपत्र बनवून मालमत्ता लाटण्याचा प्रयत्न केला. तसेच तिघांनीही मृत्युपत्र खरे असल्याचे भासवून फसवणूक केली. फोलाने हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असून, त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com