शिक्षणाच्या माहेरघरात होतेय पदव्यांची विक्री!

Education
Education

पुणे : 'शिक्षणाचे माहेरघर', 'दक्षिणेचे ऑक्सफर्ड' अशी ओळख असणाऱ्या पुण्यात शिक्षणाचा बाजार मांडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राज्य सरकारची कुठलीही परवानगी न घेता विद्यापीठाची निर्मिती करून, त्याद्वारे पैसे घेऊन पीएचडी, डिलीट यांसारख्या 20 हून अधिक पदव्यांची अक्षरशः विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मागील चार वर्षांपासून या बोगस विद्यापीठाद्वारे शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या चौघांविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

राकेश राधेश्‍याम मितल (रा. गोकुळनगर ) अफताब अन्वर मकबूल शेख (रा. वडगाव शेरी), ताहीर हुसेन याकूब शेख (रा. सैनिकवाडी) पिरजादे रियासद (रा. चंदननगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी हरिभाऊ बंडुजी शिंदे (वय 52) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मध्यवर्ती कार्यालयामध्ये असलेल्या उच्च शिक्षण कार्यालयामध्ये वरिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. राकेश, अफताब, ताहीर, पिरजादे यांनी 2016 मध्ये संगनमत करून राज्य सरकारची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता 'कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी किंगडम ऑफ टोगा' या नावाच्या विद्यापीठाची निर्मिती केली. संबंधित विद्यापीठाचे लुल्लानगर येथील सिंध हिंद सोसायटीमध्ये इंटरनॅशनल रिलेशन ऑफीस हे कार्यालय थाटले. त्यानंतर संबंधित विद्यापीठाचे बनावट व खोटे माहितीपत्रक तयार व प्रसारित केले. त्यानंतर या विद्यापीठामार्फत पीएचडी, डिलीट, डीएससी टॉपीक्‍स यांसारख्या पदव्या लोकांना विकून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतला. तसेच नागरिकांची दिशाभूल करून त्यांची फसवणूक केली. त्याचप्रमाणे सरकारचीही फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. 

"उच्च शिक्षण कार्यालयाद्वारे संबंधीत विद्यापीठाची चौकशी करण्यात आली, त्यामध्ये त्यांनी राज्य सरकारची परवानगी न घेता हा विद्यापीठाची निर्मिती केली. त्याद्वारे नागरिकांची व सरकारची फसवणूक केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास करण्याचे काम सुरू आहे.''
- व्हि.डी.गुर्जर, पोलिस उपनिरीक्षक, वानवडी पोलिस ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com