बनावट पीएच.डी.प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

पुणे - बनावट पीएच.डी. प्राप्त करून पदोन्नती व आर्थिक फायदा घेतल्याप्रकरणी स्पायसर अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरूंसह चौघांविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. मुख्य वित्त अधिकारी, कला विभागप्रमुख, एका खासगी संस्थेच्या संचालकासह बनावट पीएच.डी. बनविणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पुणे - बनावट पीएच.डी. प्राप्त करून पदोन्नती व आर्थिक फायदा घेतल्याप्रकरणी स्पायसर अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरूंसह चौघांविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. मुख्य वित्त अधिकारी, कला विभागप्रमुख, एका खासगी संस्थेच्या संचालकासह बनावट पीएच.डी. बनविणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी ऍलन केरी अल्मेडिया (वय 53, रा. सॅलसबरी पार्क, गुलटेकडी) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून कुलगुरू नोबल प्रसाद पिल्ले, मुख्य वित्त अधिकारी रत्नास्वामी जयेम, कला विभागप्रमुख चाको पॉल, क्रिएटिव्ह एज्युकेशनल फाउंडेशनचे संचालक गोपाल भिकाजी खंदारे यांच्यासह आणखी एकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

अल्मेडिया हे एका चर्चच्या माध्यमातून सामाजिक कार्य करतात. मागील वर्षी त्यांनी एका नियतकालिकामध्ये नोबल पिल्ले, रत्नास्वामी पिल्ले, चाको पॉल यांना पीएच.डी. मिळाल्याची बातमी वाचली होती.

मात्र, या प्रकरणामध्ये काहीतरी चुकीचे घडत असल्याबद्दल त्यांना शंका आली होती. त्यानुसार त्यांनी संबंधित विद्यापीठाकडे तक्रार केली होती. त्यानंतर पुन्हा संस्थेलाही ही माहिती दिली. त्यांच्याकडून दाद न मिळाल्याने अखेर त्यांनी माहिती अधिकारात माहिती मागवून संबंधित प्रकरण राज्य सरकारकडे पाठविले. त्यानुसार राज्य सरकारने पुणे पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले. पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी सहआयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे व सहायक पोलिस आयुक्त समीर शेख यांनी हे प्रकरण युनिट एकचे पोलिस निरीक्षक नितीन भोसले पाटील यांच्या पथकाकडे तपासाकरिता सोपविले.

पोलिसांच्या पथकाने हिमाचल प्रदेशातील मानवभारती विद्यापीठात जाऊन चौकशी केली. त्या वेळी बनावट पीएच.डी. प्रकरण उघडकीस आले. त्याद्वारे पदोन्नती मिळविण्याबरोबरच आर्थिक फायदे घेतले, तर स्पायसरच्या कुलगुरूंसह दोघांनीही खंदारे यांच्याशी संगनमत करून बनावट पीएच.डी. मिळविली, त्यासाठी पैसेही दिल्याचे उघडकीस आले. दरम्यान, या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, आणखी अनेकजण त्यात दोषी असल्याचे तपासात निष्पन्न होऊ लागल्याचे भोसले पाटील यांनी सांगितले.

Web Title: bogus Ph.d. case crime