बनावट सही करणाऱ्या स्टॅम्प व्हेंडरचा पर्दाफाश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जून 2019

देशपांडे कुटुंबीयांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुद्रांक कसे मिळविले, बनावट सही-शिक्के वापरून मुद्रांकाची विक्री का व कोणाला केली, या प्रकरणात त्यांच्याबरोबर आणखी कोण साथीदार आहेत का, यादृष्टीने तपास सुरू आहे.
- सुनील कलगुटकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विश्रामबाग पोलिस ठाणे

तिघांना अटक; 86 लाखांचे 11 हजार 736 मुद्रांक जप्त
पुणे - शासकीय कोशागारातील अधिकाऱ्यांची बनावट सही तसेच शिक्‍क्‍यांचा वापर करून मुद्रांकाची विक्री करणाऱ्या शनिवारवाड्याजवळील देशपांडे स्टॅम्प व्हेंडर्सचा विश्रामबाग पोलिसांनी मंगळवारी रात्री पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी शंभर आणि पाचशे रुपयांचे 86 लाख 38 हजारांचे 11 हजार 736 मुद्रांक जप्त केले असून, एकाच कुटुंबातील तिघांना अटक केली आहे.

देशपांडे स्टॅम्प व्हेंडरचे चिन्मय सुहास देशपांडे (वय 26), सुहास मोरेश्वर देशपांडे (वय 59), सुचेता सुहास देशपांडे (वय 54, तिघेही रा. पारसनीस वाडा, कसबा पेठ) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात फसवणूक, संगनमत करणे तसेच दी स्टेट एम्ब्लेम ऑफ इंडिया (प्रोहिबिशन ऑफ इम्प्रॉपर युज) ऍक्‍ट 2005 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव यांनी यासंदर्भात विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपींनी वरिष्ठ कोशागार अधिकारी आणि प्रथम मुद्रांक लिपिक कोशागार यांचे शिक्के तयार केले. तसेच, त्यांची बनावट सही आणि शिक्‍क्‍यांचा वापर करून मुद्रांकाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी रात्री पोलिसांनी देशपांडे स्टॅम्प व्हेंडरचे लाल महालासमोरील कमला कोर्ट इमारतीतील तसेच शनिवार पेठेतील पार्वती माता सोसायटीत असलेल्या दुकानावर छापे टाकले. मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कलगुटकर आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

तिघांना 21 जूनपर्यंत कोठडी
अटक करून तिघांनाही बुधवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सरकार पक्षाकडून सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी त्यांना पोलिस कोठडी देण्याची विनंती केली. तर, देशपांडे पोलिसांना तपासात सहकार्य करीत आहेत. त्यांच्याकडून मुद्रांक, शिक्के जप्त करण्यात आले आहेत. मुद्रांकाच्या पडताळणीत देशपांडे यांना देण्यात आलेल्या मुद्रांकाची आकडेवारी शासकीय नोंदीशी जुळली आहे. कोणीतरी खोडसाळपणे पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यामुळे तिघांना कोठडी देण्याची गरज नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील ऍड. मिलिंद पवार यांनी केला. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. एस. जोंधळे यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून तिघांना शुक्रवारपर्यंत (ता. 21) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

तेलगी प्रकरणाची सुनावणी अद्याप सुरू
अब्दुलकरीम लाडसाब तेलगी याने केलेला कोट्यवधी रुपयांचा बनावट मुद्रांक घोटाळाही बंडगार्डन पोलिसांनी उघडकीस आणला होता. या प्रकरणात दिग्गज नेते, शासकीय मुद्रणालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे पुढे आली होती. तेलगी याचा मृत्यू झाला आहे. तर, अन्य आरोपींच्या विरोधातील खटला 2002 पासून येथील सत्र न्यायालयात सुरू आहे. तेलगीने बनावट मुंद्राक तयार केले होते. तर, देशपांडे यांच्यावर बनावट सही केल्याचा व खोटे शिक्के मारल्याचा गुन्हा दाखल आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bogus Stamp Vendor Arrested Crime