नापास मित्रासाठी बोगस विद्यार्थी बनुन दिली परिक्षा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

 पुणे : दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात नापास झालेले आपले मित्र पास म्हणून पास झालेल्या तीन 'हुशार' वर्गमित्रांनीच चक्क बोगस विद्यार्थी बनून फेरपरीक्षेत पेपर सोडविण्याची शक्कल लढविली. बनावट प्रवेश पत्र (हॉल तिकीट) बनवून विद्यार्थ्यांनी केलेला हा प्रकार पर्यवेक्षकांच्या तत्काळ लक्षात आला. त्यानंतर संबंधित शाळेने याप्रकरणी सहा विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. हा प्रकार मंगळवारी शुक्रवार पेठेतील एका शाळेत घडला. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च मध्ये झालेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी तसेच श्रेणी सुधारण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी मंगळवारपासून फेरपरीक्षा घेण्यास सुरवात केली. या फेरपरीक्षेमध्येच हा प्रकार घडला. कसबा पेठेतील एका शाळेतील तीन विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात नापास झाले होते. या नापास विद्यार्थ्यांचे इतर मित्र पास झाले. परंतु तिघेजण नापास झाल्यामुळे त्यांना पास करण्यासाठी इतरांनी प्रयत्न सुरू केले. 

दरम्यान, हुशार विद्यार्थ्यांनी नापास विद्यार्थ्यांच्या बोर्डाने दिलेल्या हॉल तिकिटावरील छायाचित्र बदलून बनावट हॉल तिकीट तयार केले. त्या ठिकाणी स्वतःचे छायाचित्र लावून ते विद्यार्थी आपणच असल्याचे भासविले. मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता साडे दहा वाजता शुक्रवार पेठेतील डॉ.नरहरी काशिनाथ घारपुरे प्रशालेतील परीक्षा केंद्रावर सर्व परीक्षार्थी वर्गामध्ये गेले. त्यानंतर सर्वांना प्रश्‍नपत्रिका व उत्तरपत्रिका देण्यात आली. तोपर्यंत साडे अकरा वाजले होते. सर्व विद्यार्थ्यांनी पेपर सोडविण्यास सुरवात केली होती.

 दरम्यान वर्गावरील पर्यवेक्षकांनी हॉल तिकीट तपासण्यास सुरवात केली. त्यावेळी एका विद्यार्थ्याच्या हॉल तिकिटावरील छायाचित्र आणि पर्यवक्षेकाकडील हॉल तिकिटावर असलेले छायाचित्र वेगळे असल्याचे पर्यवेक्षकाच्या निदर्शनास आले. त्यानंतर आणखी दोन विद्यार्थीही याच पद्धतीने त्यांना आढळून आले. पर्यवेक्षकाने हा सर्व प्रकार शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी पवार यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर पवार यांनी पेपर देणारे विद्यार्थी व ज्यांचा पेपर देत होते ते, अशा सहा विद्यार्थ्यांविरुद्ध मंगळवारी रात्री खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सर्व विद्यार्थी 15 ते 17 या वयोगटातील आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक विष्णू केसरकर या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Web Title: A bogus student coght in pune