बनावट विद्यार्थी पास बनविणाऱ्यास पकडले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

पीएमपीचे बनावट पास बनवून त्याची स्वस्तात विक्री करणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याला पीएमपी प्रशासनाने सापळा रचून पकडले. वाहकाच्या दक्षतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. याबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पुणे - पीएमपीचे बनावट पास बनवून त्याची स्वस्तात विक्री करणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याला पीएमपी प्रशासनाने सापळा रचून पकडले. वाहकाच्या दक्षतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. याबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

११ जुलैला स्वारगेट ते पुणे स्टेशन मार्गावर धावणाऱ्या पीएमपी बसचे वाहक अशोक सैतान यांना स्टेशन ते पॉवरहाऊस प्रवासादरम्यान एका विद्यार्थ्याने पास दाखविला. सैतान यांना तो संशयास्पद वाटला. त्यांनी विद्यार्थ्यांकडे सखोल चौकशी केली. तेव्हा तो बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्या वेळी  ७५० रुपये किमतीचा पास वडगाव शेरी भागात राहणाऱ्या १७ वर्षीय मुलाने ६५० रुपयांना तयार करून दिल्याचे त्याने सांगितले.

वाहक सैतान यांनी पीएमपी प्रशासनाला यासंदर्भात माहिती दिली. त्यानुसार मुख्य वाहतूक निरीक्षक कुसाळकर, तिकीट तपासणीस आणि पास विभागातील सेवक आनंदा पेटकर आणि पोलिसांच्या पथकाने एका १७ वर्षीय विद्यार्थ्याला स्वस्तात बनावट पास बनवून देताना पकडले आहे. दरम्यान, वाहक सैतान यांनी बंडगार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे. संशयिताने आणखी किती जणांना, असे बनावट पास बनवून दिले आहेत. त्यामुळे पीएमपीची किती फसवणूक झाली, याचा तपास पोलिस घेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bogus Student Pass Maker Arrested Crime