पुण्यात वसंत टॉकीजजवळ बाँबची अफवा (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

बॉंब शोधक व नाशक पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव तोडले यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकातील पोलिस हवालदार बापू खेसे, बाळासाहेब लोखंडे, जी. डी. डांगे, रवींद्र यादगिरी, रवींद्र धुमाळ, केशव लोळे, पोलिस नाईक नितीन बुधावले आदींच्या पथकाने ही तपासणी केली.

पुणे : वसंत टॉकीज चौकातील प्रकाश डिपार्टमेंडल स्टोअरसमोरील फुटपाथवार बॉंब ठेवल्याचे एका अज्ञात व्यक्तीने पोलिस नियंत्रण कक्षाला कळविले. त्यानुसार बॉंबशोधक पथकांसह फरासखाना पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अखेर तपासात कपड्यांनी भरलेली ट्रॉली बॅग असल्याचे निष्पन्न झाले आणि बॉंब शोधक पथकातील कर्मचारी, फरासखान्याचे पोलिस अधिकारी आणि उपस्थित ग्रामस्थांनी सुटकेचा श्‍वास सोडला. सोमवारी (ता.11) रात्री सव्वादहा वाजता ही तपासणी मोहिम संपली. 

रात्री नऊ वाजून 28 मिनिटांच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पोलिस नियंत्रण कक्षातील 100 क्रमांकावर दूरध्वनी करून वसंत टॉकीज चौकात संशयित बॅग असल्याचे कळविले. पोलिस नियंत्रण कक्षाने ही बाब ताततडीने फरासखाना पोलिसांना कळविली. त्यानंतर वेगाने सूत्रे हलवत अवघ्या दहा मिनिटांच्या बॉंब शोधक व नाशक पथक राणा या श्‍वानासह घटनास्थळी हजर झाले. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी लाल महाल चौक ते फरासखाना पोलिस ठाण्यावरील मजूर अड्डा चौकापर्यंतचा रस्ता पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केला. या दोन्ही चौकातून वाहतूक अन्यत्र वळविण्यात आली. रात्री नऊ वाजून 36 मिनिटांनी सुरू केलेली ही बॉंब शोध मोहिम सव्वादहा वाजता संपली. 

बॉंब शोधक व नाशक पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव तोडले यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकातील पोलिस हवालदार बापू खेसे, बाळासाहेब लोखंडे, जी. डी. डांगे, रवींद्र यादगिरी, रवींद्र धुमाळ, केशव लोळे, पोलिस नाईक नितीन बुधावले आदींच्या पथकाने ही तपासणी केली. बॉंब शोधक कर्मचाऱ्यांना फरासखाना पोलिसांनी याकामी मदत केली. दरम्यान, ही विसरलेली कपड्याची कोणाची असल्यास, संबंधिताने ओळख पटवून ती घेऊन जाण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

Web Title: bomb hoax in Mandai area at Pune