अन् अखेर चिमुकल्यांचा जीव वाचला (व्हिडिओ)

सकाळ वृत्‍तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

सहा जणांची सुटका
आदर्शनगर झोपडपट्टीमध्ये पाणी शिरल्यानंतर खडकी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल भोसले यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत नागरिकांना तेथून बाहेर पडण्याचे आवाहन केले. एका झोपडीमध्ये सहा जण अडकल्याचे भोसले यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ पाण्यात उडी घेऊन पोहत त्यांच्यापर्यंत पोचले. त्यानंतर अग्निशामक दलाच्या मदतीने सहा जणांची सुटका केली.

पुणे - बोपोडीतील आदर्शनगर झोपडपट्टीमध्ये रविवारी सकाळी पाणी शिरले. या वेळी घरात अडकलेले तीन महिन्यांचे बाळ, दोन वर्षांचा चिमुकला, त्याची आई व आजी यांची अग्निशामक दलाच्या जवानांसह महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी व पोलिसांनी एकत्र येऊन सुटका केली. कमरेइतक्‍या पाण्यातून या बाळाला पाळण्यासहित अलगदपणे बाहेर काढून त्याच्या आईकडे सोपविण्यात आले.

मुळा व पवना नदीची पाणीपातळी शनिवारपासून वाढण्यास सुरवात झाली. रविवारी पहाटेपासून त्यात आणखी वाढ झाली. यामुळे बोपोडी येथील भाऊ पाटील रस्त्यावरील आदर्शनगर झोपडपट्टीमध्ये पाणी शिरले. कांबळे वस्ती, चव्हाण वस्ती, अयोध्यानगरी, कोटकर लेन, बॉटनीकल गार्डन, चंद्रमणी संघ यासारख्या सखल भागांतील घरांमध्ये पाणी शिरले. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी व परिसरातील कार्यकर्त्यांनी पाण्यात अडकलेल्या नागरिकांना घराबाहेर काढून जवळच्या शाळेमध्ये हलविले.

दरम्यान, नदीच्या किनाऱ्याजवळ असलेल्या एका झोपडीतील शेख कुटुंब पाणी शिरणार नाही, असे समजून घरातच थांबले. मात्र काही वेळेनंतर त्यांच्या घरातही पाणी शिरले. त्या वेळी आलिया मेहबूब शेख (वय २४), त्यांच्या सासू खाशिदी अब्दुल शेख (वय ५२), मुले जियान (वय ३ महिने) व अजान (वय दोन वर्षे) हे या घरामध्ये अडकले होते. अचानक आलेल्या पाण्यामुळे त्यांनी आरडाओरडा सुरू केला. स्थानिक कार्यकर्त्यांनी याबाबत अग्निशामक दलास माहिती दिली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन शेख कुटुंबास सुरक्षितपणे घराबाहेर 
काढले. अग्निशामक दलाच्या जवानांसह पोलिस व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तीन महिन्यांच्या बळाला पाळण्यासहित कमरेइतक्‍या पाण्यातून बाहेर काढून त्याच्या आईकडे सोपविले. कसबा अग्निशामक केंद्राचे तांडेल विकास सितायकर, फायरमन कमलेश चौधरी, सुरेश पवार, संतोष अरगडे, राजू शेख यांच्या पथकाने ही कामगिरी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bopodi Flood Water Small Baby Life Saving Fire brigade Jawan