पालिका बांधणार सीमाभिंती

कात्रज - पद्मजा पार्क शेजारी नाल्यालगतची पडलेली सीमाभिंत.
कात्रज - पद्मजा पार्क शेजारी नाल्यालगतची पडलेली सीमाभिंत.

पुणे - पाऊस आणि पुराच्या पाण्याने वेगवेगळ्या भागांतील सोसायट्या, बंगल्यांभोवतीच्या कोसळलेल्या सीमाभिंती बांधून देण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत.

पुराचा फटका बसलेल्या सोसायट्या, सीमाभिंती, त्यांची स्थिती आणि बांधणीच्या खर्चाचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी निकष ठरविले जाणार असून, त्यानुसारच सीमाभिंती व अन्य कामे करण्यात येतील, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

पुण्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने दक्षिण भागातील सोसायट्या, बैठ्या घरांत पाणी शिरले. प्रचंड प्रमाणात पाणी रस्त्यांवर आल्याने त्यालगतच्या घरांचे मोठे नुकसान झाले. ओढ्या-नाल्यांशेजारच्या सोसायट्यांमध्ये महापुराची स्थिती ओढविली होती. पाण्याच्या वेगामुळे अनेक भागांत सीमाभिंतीसह सोसायट्यांचे नुकसान झाल्यामुळे या सोसायट्या असुरक्षित असल्याची भीती रहिवाशांमध्ये आहे. त्यात पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने सोसायट्यांलगतच्या सीमाभिंती बांधून देण्याची मागणी रहिवाशांची आहे. या पार्श्‍वभूमीवर पूरग्रस्तांना मदत करण्याची भूमिका महापालिकेने घेतली असून, त्यात सीमाभिंतीचा समावेश करण्यात येत आहे. 

महापालिका आयुक्त सौरभ राव म्हणाले, ‘‘पुरामुळे ज्या सोसायट्यांच्या सीमाभिंती पडल्या आहेत, त्या बांधून देता येतील का, याचा विचार सुरू आहे. यासाठी नेमका किती खर्च येतो, त्याचा आढावा घेण्यात येत आहे. तसेच, पडलेल्या भिंतीची खातरजमा करून पुढील कार्यवाही केली जाईल.’’

पूल सुरक्षित करणार
पावसामुळे लोकवस्त्यांमधून वाहणाऱ्या ओढ्या-नाल्यांवरील पूल खचले आहेत. काही पुलांचे लोखंडी आणि सिमेंटचे कठडे वाहून गेल्याने पूल असुरक्षित झाल्याने अपघाताची भीती आहे, त्यामुळे हे पूलही तातडीने दुरुस्त करून ते सुरक्षित करण्यात येणार आहेत. ही कामे सुरू करण्याच्या सूचनाही महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित खात्याला दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com