दीड तासाच्या प्रयत्नानंतर सार्थकची सुटका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

देव तारी त्याला कोण मारी...  
छोटा सार्थक हा खेळताना बोअरवेलमध्ये पडला त्या वेळी बोअरच्या तोंडाला बांधलेले बारदान त्याच्या पायात अडकले. बारदानासह तो बोअरवेलमध्ये पडला आणि याच बारदानाने त्याला जीवदान दिल्याचे स्पष्ट झाले. कारण, बारदान बोअरवेलमध्ये आतील बाजूला अडकले गेले आणि सार्थक वाचला.

शिरूर/तळेगाव ढमढेरे - खेळता-खेळता दोन वर्षांचा लहानगा बोअरवेलमध्ये पडला... त्याच्यासोबत खेळणाऱ्या इतर बालचमूंनी आरडाओरडा केल्याने, जवळच असलेली त्याची आई धावत आली... तिच्या जिवाचा आकांत रानोमाळ घुमला अन्‌ सर्व यंत्रणा तातडीने कामाला लागून अवघ्या दीड तासात हा लहानगा मृत्यूच्या दाढेतून सुखरूप आईच्या कुशीत विसावला!

रांजणगाव एमआयडीसीजवळ कारेगाव (ता. शिरूर) हद्दीतील दादाभाऊ नवले यांच्या आंब्याच्या बागेतील बोअरवेलजवळ आज सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली; पण रांजणगाव एमआयडीसी पोलिस, एमआयडीसीतील फायर ब्रिगेड आणि स्थानिक ग्रामस्थांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे बोअरवेललगत १५ फुटांचा खड्डा खोदून आडवे खोदत जाऊन, बोअरवेलमध्ये बारा फुटांवर अडकलेल्या सार्थकला दीड तासाच्या अंतराने म्हणजे साडेदहा वाजता सुखरूप बाहेर काढण्यात आले. 

माती नाकातोंडात गेल्याने; सेच बोअरवेलमध्ये खाली घरंगळत जाताना डोक्‍याला किरकोळ मार लागल्याने सार्थकला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर तेथे उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती धोक्‍याच्या बाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे सर्वच यंत्रणांनी सुटकेचा निःश्वास टाकला. सार्थकची आई काजल राहुल धोत्रे या गेल्या दोन महिन्यांपासून, दादाभाऊ नवले यांच्या शेताजवळील चाळीत राहात असून, खासगी कंपनीत कामाला आहेत. मूळच्या माउलीनगर (ता. आष्टी, जि. बीड) येथील रहिवासी असलेल्या काजल या आपल्या परिसरात दुष्काळ पडल्याने कामाच्या शोधात आल्या असून, आपली मावशी लक्ष्मी मिटकर यांच्यासमवेत राहतात.

Web Title: Borewell Sarthak Dhotre Life Saving