बोरघाटातील ‘भय संपत नाही’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जून 2019

घाटमार्गासाठी उपाययोजना
बहुतांशी बोगद्याच्या तोंडावर दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. धोकादायक ठिकाणी निरीक्षणासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, लोखंडी खांबांचे बॅरिकेड लावले आहेत. रेल्वे गाड्यांमुळे बसणाऱ्या हादऱ्यामुळे दरड सैल झाल्याने घाट मार्गातील काही भाग धोकादायक झाला आहे. तेथे सर्व 
तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्यात येणार असून, घाटमार्ग अधिक सुरक्षित व सक्षम बनविण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

लोणावळा - पाऊस नसतानाही बोरघाटात आठवडाभरात दरड कोसळण्याच्या दोन घटना घडल्याने रेल्वेची यंत्रणा तोकडी पडत असल्याचे चित्र आहे. या घटनांमध्ये कसलीही जीवितहानी झाली नसली, तर प्रवाशांमध्ये ‘भय इथले संपत नाही’ अशीच अवस्था आहे. 

गेल्या वर्षी दरड कोसळण्याच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. यात जीवितहानीही झाली. पुणे-मुंबई रेल्वेमार्ग हा देशातील सर्वांत महत्त्वाचा व व्यस्त रेल्वेमार्ग मानला जातो. या मार्गावरून रोज शेकडो रेल्वेगाड्यांची ये-जा सुरू असते. मात्र, सध्या बोरघाट परिसरात दरड कोसळण्याच्या घटना वाढल्याने रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले असले, तरी उपाययोजना तोकडी असल्याचे चित्र आहे. दरड कोसळण्याच्या व घाटक्षेत्राजवळ रेल्वेगाड्या घसरण्याच्या घटना वाढल्याच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वेने आयआयटी-मुंबई व लखनौ येथील ‘रिसर्च डिझाइन अँड स्टॅंडर्ड ऑर्गनायझेशन’ या संस्थांतर्फे घाटमार्गाचा ड्रोनच्या साहाय्याने सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला होता. रेल्वे प्रशासनाने २९ किलोमीटर घाटमार्गाचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Borghat Landslide Danger