पौडमध्ये होणार ‘बॉटनिकल गार्डन’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

सोमाटणे - पर्यावरण मंत्रालयाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांतर्गत पश्‍चिम महाराष्ट्रातील दुर्मिळ जातीच्या वनस्पती संशोधन, जतन संवर्धनासाठी शिरगावचे डॉ. संतोष गोपाळे यांची निवड झाली आहे. 

सोमाटणे - पर्यावरण मंत्रालयाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांतर्गत पश्‍चिम महाराष्ट्रातील दुर्मिळ जातीच्या वनस्पती संशोधन, जतन संवर्धनासाठी शिरगावचे डॉ. संतोष गोपाळे यांची निवड झाली आहे. 

या उपक्रमासाठी भारतातून २५० संशोधकांनी प्रकल्प सादर केले होते. त्यातील तीस प्रकल्पाची निवड करण्यात आली. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये प्राध्यापक असलेल्या डॉ. गोपाळे यांनी २०१४ मध्ये केंद्र शासनाच्या मदतीने बायोडिझेल प्रकल्पावर संशोधन केले होते. या संशोधनानंतर त्यांना केंद्र शासनाच्या वतीने ‘युवा संशोधक पुरस्कार’ देण्यात आला होता. तर, या वर्षी केंद्राने दुर्मिळ जातीच्या औषधी वनस्पती संशोधन, जतन व संवर्धन हा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी या प्रकल्पासाठी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वतीने पौड येथील जंगलातील पाच एकर जागा उपलब्ध करण्यात आली. सोसायटीचे कार्यवाह गजानन एकबोटे, सचिव श्‍यामकांत देशमुख, प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव, माजी सचिव डॉ. ए. के. पांडे, माजी प्राचार्य एस. वाय. परांजपे यांनी प्रकल्पासाठी सहकार्य केले. बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गोपाळे हे प्रकल्प पूर्ण करणार आहेत. 

या प्रकल्पाअंतर्गत जंगलातील सर्व प्रकारच्या दुर्मिळ जातीच्या औषधी वनस्पतींचे शोध घेऊन व संशोधन करून पाच एकर जागेत त्यांचे संवर्धन करणार आहेत. केंद्र शासनाच्या ३४ लाख रुपयांच्या निधीतून ही ‘बॉटनिकल गार्डन’ व ‘रोपवाटिका’ तयार करण्यात येणार आहे. डॉ. गोपाळे हे सकाळ-संध्याकाळ शेतीची कामे करून प्राध्यापकाची नोकरी करतात. एका शेतकऱ्याला प्रकल्प मिळाल्याबद्दल शिरगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे.

असा असेल गार्डन
या गार्डनमध्ये पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्व दुर्मिळ जातींच्या औषधी वनस्पतीची लागवड करण्यात येईल. हे गार्डन राज्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी व अभ्यासासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर संबंधित वनस्पती नामशेषाची कारणे, त्यांचे जतन व संवर्धनासाठीचे उपाय याचा अहवाल शासनाला सादर करणार असल्याचे डॉ. गोपाळे यांनी सांगितले. 

Web Title: botanical garden in paud