सर्पदंशाने घेतला जीव; पण 'डॉक्टर स्पर्शा'ने परतला श्वास

रविवार, 26 मे 2019

- हृदयक्रिया पडली होती बंद.

- डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान.

नारायणगाव : सर्पदंश झाल्यानंतर चार वर्षीय बालकाची हृदयक्रिया बंद पडली होती. सर्पदंश झाल्याचे समजल्यानंतर संबंधित बालकावर त्वरित वैद्यकीय उपचार सुरु करण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या अथक प्रयत्नांना यश आल्याने या बालकाला सुदैवाने जीवनदान मिळाले. त्यामुळे 'डॉक्टर तारी त्याला कोण मारी' याचा प्रत्यय या घटनेमुळे येत आहे. 

आर्य भुवारी असे संबंधित बालकाचे नाव आहे. घरात उकाडा होत असल्याने आर्य रात्री अंगणात झोपला होता. रात्री साडेआठच्या सुमारास शेतातून आलेल्या नागाने फणा काढून आर्यच्या उजव्या पायाला दोनवेळा दंश केला. आर्यचा रडण्याचा आवाज ऐकून श्‍याम भुवारी आर्यजवळ आले. त्यानंतर नागाने श्‍याम यांनाही दंश करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नाग शेतात निघून गेला.

सर्पदंश झाल्याने आर्यची हृदयक्रिया बंद पडली होती. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास घोडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. या प्राथमिक उपचारानंतर नारायणगाव येथील विघ्नहर मेडिकल फाऊंडेशनचे सर्पदंश व विषबाधातज्ञ डॉ. सदानंद राऊत आणि डॉ.पल्लवी राऊत यांनी त्याच्यावर उपचार केले. या बालकाचे प्राण वाचविण्यासाठी तब्बल चौदा तासांचे अथक प्रयत्न करावे लागले. त्यानंतर या मुलाला जीवनदान मिळाले.

जीवनदान देऊन डॉक्टरांनी दिले 'बर्थ डे गिफ्ट'

उद्या (ता.27) आर्यचा वाढदिवस आहे. डॉक्टरांनी त्याला जीवनदान देऊन एकप्रकारे 'बर्थ डे गिफ्ट'च देऊ केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boy bitten by snake but saves life due to efforts of Doctors