पुणे : मोबाईलच्या व्यसनातून मुलाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

- बिबवेवाडीतील धक्‍कादायक घटना

पुणे : मोबाईलच्या आहारी गेलेल्या अल्पवयीन मुलाने मोबाईलवर चित्रीकरण सुरू ठेवून गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना बिबवेवाडीत रविवारी पहाटे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

लखन वाघमारे (वय 16, रा. खामकर वस्ती, बिबवेवाडी), असे त्या मुलाचे नाव आहे. बिबवेवाडी ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुमार घाडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लखन हा त्याच्या आजीसमवेत बिबवेवाडीत राहात होता. लखनच्या वडिलांचा काही वर्षांपूर्वीच मृत्यू झाला आहे, तर आई घरातून निघून गेली आहे. त्यामुळे आजी त्याला सांभाळत होती. दरम्यान, लखनला मोबाईलचे मोठ्या प्रमाणात व्यसन होते. त्याने शिक्षण घेणेही सोडून दिले होते. काही दिवसांपूर्वीच त्याने नवीन मोबाईल खरेदी केला होता. शिक्षण व काम करत नसल्याने तो सतत मोबाईलमध्ये व्यग्र होता. 

काय वाटते! किती कोटींचे कर्ज आहे महाराष्ट्रावर

दरम्यान, नातवाने अभ्यासाकडे लक्ष द्यावे, चांगले शिक्षण घ्यावे, यासाठी त्याची आजी आग्रही होती. त्याबाबत ती त्याला सतत सांगत होती. दरम्यान, रविवारी पहाटे त्याने स्वयंपाकघरामध्ये जाऊन मोबाईलचे चित्रीकरण सुरू ठेवले. त्यानंतर छतावरील हुकला दोरी अडकवून त्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, काही वेळाने आजी स्वयंपाकघरामध्ये गेली. तेव्हा त्यांना धक्‍काच बसला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. 

लखनला मोबाईल गेमची आवड होती. तो तासनतास गेम खेळत बसत होता. गेमच्या आहारी गेल्यामुळेच त्याने हा प्रकार केल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेल्या टिकटॉक व्हिडिओप्रमाणेच संबंधित मुलानेही आत्महत्या करताना मोबाईलवर चित्रीकरण केल्याचे निष्पन्न झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A boy did Suicide after addicted of Mobile in Pune