इतरांचे रुद्र जाऊ देऊ नका; पालकांचे महापालिकेला आवाहन 

drown
drown

पुणे : एक रुद्र खेळात हुशार, तर दुसरा खेळाबरोबरच अभ्यासातही हुशार. रुद्र भुजबळ व रुद्र चव्हाण या अवघ्या दुसरी-तिसरीत असलेल्या दोन मित्रांनी आपापल्या शाळेत भरपूर पदकेही मिळवली. आपल्या वागण्याने सगळ्यांची मनेही जिंकली. एकमेकांना कायम साथ देणारी ही दोन कोवळी मुले महापालिकेच्या अनास्थेमुळे अचानक या जगातून निघून गेली. या धक्‍क्‍यातून भुजबळ व चव्हाण कुटुंब अद्यापही बाहेर पडले नाहीत. "आमची हसती-खेळती, एकुलती एक मुले जगातून गेली. महापालिकेने त्यांची जगण्याची संधी हिरावली. आता इतरांचे रुद्र जाऊ देऊ नका, अशा केविलवाण्या आणि काळजाला भिडणाऱ्या शब्दांत त्यांनी हे आवाहन केले आहे. 

गेल्या रविवारी दुपारी साडेतीन ते सहाच्या सुमारास येरवड्यातील मातोश्री शाळेच्या आवारात खेळण्यासाठी रुद्र भुजबळ व रुद्र चव्हाण गेले. शाळेजवळच महापालिकेने एक मोठा खड्डा केला आहे. त्यात साठलेल्या पाण्यामध्ये बुडून दोघांचा मृत्यू झाला. कामावरून घरी आलेले रुद्र भुजबळचे वडील दत्ता यांनी मुलाची विचारपूस केली. तेव्हा तो दुसऱ्या रुद्रच्या घरी कॅरम खेळण्यासाठी गेल्याचे कळले. थोड्या वेळाने रुद्र चव्हाणच्या घरी विचारल्यानंतर दोघेही तिथे नसल्याचे कळले. तेवढ्यात भुजबळ यांना शाळेजवळील खड्ड्यात दोन लहान मुलांचे मृतदेह तरंगत असल्याचे कळल्यावर दोन्ही कुटुंबातील सदस्यांच्या काळजाचा ठोका चुकला. 

रुद्र चव्हाण याचा मृतदेह बाहेर काढला. त्या वेळी आपला रुद्रही याच रुद्रबरोबर असल्यामुळे भुजबळ चिंताग्रस्त झाले. दीड तासाने त्यांच्या रुद्रचाही मृतदेह तेथेच मिळाला. दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. आमची मुले खेळकर होती. साहजिकच ती खेळण्यासाठी गेली आणि पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडली. खोदलेल्या खड्ड्याभोवती सुरक्षितता बाळगण्याची जबाबदारी महापालिकेची नव्हती का? असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला. 

महापालिकेनेच आमच्या मुलांची जगण्याची संधी हिरावली. शहरात अजूनही ठिकठिकाणी असेच खड्डे, खुल्या केबल आहेत. तेथेही मुलांच्या जिवाला धोका आहे. या घटनेनंतर महापालिका प्रशासन जागे होईल, अशी अपेक्षा आहे. नाहीतर आणखी किती रुद्रचे जीव जायची आपण वाट पाहणार आहोत. दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, त्याचबरोबर जीवघेणाऱ्या व्यवस्थेलाही जाब विचारावा लागेल. 
-दत्ता भुजबळ, रुद्रचे वडील 

एकमेकांचे चांगले मित्र 
रुद्र भुजबळ व रुद्र चव्हाण ही दोन्ही मुले काही वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र बनले होते. रुद्र भुजबळ हा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत होता. दोघांनाही खेळाची आवड होती. टेबल टेनिस, कॅरम व धावण्याचे त्यांना वेड होते. शाळा सुटल्यानंतर दोघेही एकत्र खेळत. आता तर शाळेला सुट्या लागल्याने दोघांनाही खेळण्यासाठी भरपूर वेळ होता. अखेर खेळतानाच दोन्ही मित्रांनी जगाचा निरोप घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com