नवीन कपडे व चॉकलेट दिल्यानंतर चेहऱ्यावर फुललेले हास्य

डी. के. वळसे पाटील
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

मंचर (पुणे) : जाधववाडी-रांजणी (ता. आंबेगाव) येथे बोअरवेल मध्ये अडकलेल्या रवी पंडीत भिल या चिमुकल्याची तब्बल साडे सोळा तासानंतर सुटका करण्यात एन.डी.आर.एफ.च्या जवानांना यश आले. मंचर उपजिल्हा रुग्णालयात रवीला आणल्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. नवीन कपडे घातल्यानंतर व डॉक्टरांनी चॉकलेट दिल्यानंतर वडील पंडित भिल यांनी चिमुकल्या रविला कडेवर घेताच रवीसह सर्व कुटुंबियांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य पाहून डॉक्टर व एन.डी.आर. एफच्या जवनांचाही आनंद द्विग्नित झाला.

मंचर (पुणे) : जाधववाडी-रांजणी (ता. आंबेगाव) येथे बोअरवेल मध्ये अडकलेल्या रवी पंडीत भिल या चिमुकल्याची तब्बल साडे सोळा तासानंतर सुटका करण्यात एन.डी.आर.एफ.च्या जवानांना यश आले. मंचर उपजिल्हा रुग्णालयात रवीला आणल्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. नवीन कपडे घातल्यानंतर व डॉक्टरांनी चॉकलेट दिल्यानंतर वडील पंडित भिल यांनी चिमुकल्या रविला कडेवर घेताच रवीसह सर्व कुटुंबियांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य पाहून डॉक्टर व एन.डी.आर. एफच्या जवनांचाही आनंद द्विग्नित झाला.

बुधवारी (ता. 20) दुपारी साडेचार वाजता रवी, त्याचा भाऊ प्रवीण पंडीत भिल (वय साडेसात), परी शरद सोनावणे (वय 4), ताई ज्ञानेश्वर भिल (वय 4) हि मुले शेतात खेळत होती. बोअरवेल झाकण्यासाठी त्यावर पोते व दगड ठेवला होता. खेळता खेळता रवी बोअरवेलच्या दगडावर गेल्याबरोबर तो बोअरवेलमध्ये पडला. हे पाहून मुलांनी आरडाओरडा केला. त्याचे वडील पंडित, इतर नातेवाईक व ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले. त्यांनी पहार, टिकाव या साहित्याने शेजारीच खड्डा घेण्यास सुरवात केली. तहसीलदार सुषमा पैकीकर, पोलिस निरीक्षक कृष्णा खराडे व पोलिस हवालदार सागर गायकवाड यांनी घटनेची माहिती सदूउंबरे-तळेगाव (ता. मावळ) येथील एन.डी.आर.एफला कळविली. जवान घटनास्थळी बुधवारी रात्री आठ वाजता आले. तोपर्यंत अधिकाऱ्यांनी व माउली खंडागळे, संतोष वाघ, सरपंच अंकुश थोरात, ग्रामसेविका सायराबानू पटेल, सुमित वाघ, मंगेश जाधव, पद्माकर जाधव, तबाजी जाधव (गुरुजी) आदी ग्रामस्थांनी पॉकलॅन व ब्रेकरची व्यवस्था केली होती. एन.डी.आर.एफचे जवान आल्यानंतर मदत कार्याला वेग आला. खडक अतिशय कठीण होता. ब्रेकर चालविण्यात तरबेज असलेले ग्रामस्थ - अनिल मंजुळे व सुनील मंजुळे या दोन भावंडानी व नवनाथ भांबेरे यांनी सुरवातीपासून शेवट पर्यंत केले. मुलाला कुठलीही इजा होणार नाही. याची काळजी सर्वजण घेत होते. आज (गुरुवार) सकाळी नऊ वाजता रवीला बाहेर काढल्यानंतर एन.डी.आर.एफचे जवान, पोलिस व ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडून जल्लोष साजरा केला.
 
Mancharचिमुकल्या रवीचा ड्रील मशिनचा हट्ट पुरविला....
चिमुकल्या रवीची आई अनिता पंडित भिल यांचे सात महिन्यापूर्वीच निधन झाले आहे. या चिमुकल्याचा सांभाळ वडील पंडित हे करतात. तो सतत रडत होता. गुरुवारी (ता. २१) सकाळी त्याच्या शरीराचा कंबरेपर्यंतचा भागातील खडक व माती दूर करण्यात यश आले. त्याला हाताने ओढून बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला. पण त्याचा डावा पाय अडकला होता. त्यामुळे त्याला बाहेर काढण्यात अडचणी निर्माण होत होत्या. तो मोबाईल मागत होता. ड्रील मशिनकडे पाहून रडतच ते चालवायला द्या. असे म्हणत होता. अखेर ड्रील मशीनचे बटन बंद चालू करण्याच्या खेळात तो मग्न झाला. त्याचे रडणे थांबले. त्यामुळे तो रडू लागला कि ड्रील मशीन त्याच्याजवळ नेण्याचे काम एन.डी.आर.एफचे जवान करत होते.

मंचर उपजिल्हा रुग्णालयात नवीन कपडे घातल्यानंतर व डॉक्टरांनी चॉकलेट दिल्यानंतर वडील पंडित भिल यांनी चिमुकल्या रविला कडेवर घेतले. त्यानंतर रवीसह सर्व कुटुंबियांच्या चेहऱ्यावर हसू पसरले. हा प्रसंग पाहून डॉक्टर, एन.डी.आर.एफचे जवान व पोलिसांचा आनंद द्विग्नित झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boy happy after new clothes and chocolate who rescued stuck in a borewell near Manchar Pune