
Crime News: प्रियकराच्या मारहाणीला कंटाळून प्रियसीची आत्महत्या; विषारी औषधाचे इंजेक्शन...
पुणे: खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकेने विषारी औषधाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रियकराने दुचाकी घेण्यासाठी परिचारिका युवतीकडे पैशांची मागणी करीत तिला मारहाण केली होती.
अश्विनी देविदास राठोड (वय २१, रा. धानोरी) असे आत्महत्या केलेल्या परिचारिका युवतीचे नाव आहे. या प्रकरणी प्रियकर बापू किसन मैद (वय २२, रा. छत्रपती संभाजीनगर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अश्विनीचे वडील देविदास राठोड (वय ५४, रा. चिखलठाण, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी किसन मैद आणि अश्विनी राठोड यांनी कन्नड येथील एका संस्थेतून नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. दोघांचे प्रेमसंबंध होते. त्यानंतर दोघेही पुण्यात नोकरीसाठी आले. अश्विनी लोहगाव भागातील एका खासगी रुग्णालयात परिचारिका होती.
किसनने तिच्याकडे नवीन दुचाकी घेण्यासाठी पैशांची मागणी केली होती. अश्विनीने नकार दिल्यानंतर त्याने तिला मारहाण करण्यास सुरवात केली. तो तिला शिवीगाळ करून त्रास द्यायचा. किसनच्या त्रासामुळे अश्विनीने विषारी औषधांची इंजेक्शन टोचून घेतले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.