चंद्रकांत पाटलांनी कोथरूडमधून माघार घ्यावी; ब्राह्मण महासंघाची मागणी

विनायक बेदरकर
Sunday, 6 October 2019

चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदाबरोबरच मंत्रिपद देखील आहे. ते संघटनेमध्ये चांगले काम करत आहेत. हे पाहता पक्षाकडून त्यांना आगामी काळात विधानपरिषद किंवा राज्यसभेवर देखील संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे त्यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघातून माघार घ्यावी व समाजाच्या उमेदवारास पाठिंबा द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी केली आहे.

पुणे : चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघातून माघार घ्यावी. अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदाबरोबरच मंत्रिपद देखील आहे. ते संघटनेमध्ये चांगले काम करत आहेत. हे पाहता पक्षाकडून त्यांना आगामी काळात विधानपरिषद किंवा राज्यसभेवर देखील संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे त्यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघातून माघार घ्यावी व समाजाच्या उमेदवारास पाठिंबा द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी केली आहे.

No photo description available.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि चंद्रकांत पाटील यांच्यात आज पुण्यात बैठक पार पडली. त्यानंतर गोविंद कुलकर्णी यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना ही भूमिका व्यक्त केली. याप्रसंगी महासंघाच्या प्रदेशाध्यक्षा मोहिनी पत्की यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

राज्यात आठवडाभरापासून कोथरूड विधानसभा मतदारसंघ चर्चेत असून, या मतदारसंघातून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात मनसेचे उमेदवार किशोर शिंदे हे असून त्यांना आघाडीकडून पाठिंबा देण्यात आला आहे. याशिवाय अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून जिल्हा अध्यक्ष मयुरेश अरगडे हे देखील निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामुळे या ठिकाणी तिहेरी लढत होणार असल्याचे सध्यातरी चित्र दिसत आहे. अद्याप उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख बाकी आहे.

यावेळी गोविंद कुलकर्णी म्हणाले की, आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली गेली आहे. तरी आम्ही पदाधिकाऱ्यांची पुन्हा बैठक घेऊन, उद्या दुपारपर्यंत चंद्रकांत पाटील यांना आमचा निर्णय सांगणार आहोत. तसेच ते पुढे म्हणाले की, ब्राम्हण महासंघाच्या काही मागण्या असून परशुराम विकास महामंडळ तयार करावे, पौराहित्य करणाऱ्या पुरोहिताना मानधन दिले जावे, ब्राह्मण समाजातील महापुरुषांची बदनामी रोखण्यासाठी कायदा करावा आदींचा यात प्रामुख्याने समावेश आहे. याविषयी त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली असल्याची त्यांनी सांगितले.

ब्राह्मण समाजाचे सर्व प्रश्न सोडवले जातील : चंद्रकांत पाटील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आणि माझ्यात बैठक झाली आहे. यादरम्यान ब्राह्मण समाजाचे प्रश्न त्यांनी माझ्यासमोर मांडले आहेत. त्यांचे सर्व प्रश्न येत्या काळात मार्गी लावले जातील. माझ्या विरोधात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून ज्यांना उमेदवारी देण्यात आलेली  आहे ते देखील अर्ज देखील मागे घेतील, असा विश्वास भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brahmin manasangh demands Chandrakant Patil not contest in Kothrud