"ब्रेकिंग न्यूज'ने मिळाले नवचैतन्य

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

निवडणुकीत नेत्यांच्या डोक्‍यात जागेची गणितं फिट्ट बसलेली असतात... असे वाक्‍य सखाराम बोलतात ना बोलतात तोच टीव्हीच्या पडद्यावर "पुण्यात आघाडीबाबत सकारात्मक चर्चा' अशी ब्रेकिंग न्यूज झळकते. त्यावर सखारामांच्या समोर बसलेल्या तुकारामांची कळी खुलते.

निवडणुकीत नेत्यांच्या डोक्‍यात जागेची गणितं फिट्ट बसलेली असतात... असे वाक्‍य सखाराम बोलतात ना बोलतात तोच टीव्हीच्या पडद्यावर "पुण्यात आघाडीबाबत सकारात्मक चर्चा' अशी ब्रेकिंग न्यूज झळकते. त्यावर सखारामांच्या समोर बसलेल्या तुकारामांची कळी खुलते.

आघाडीच्या चर्चेला वेग आल्याने त्यांनी आखलेल्या गणिताची जुळवाजुळव डोक्‍यात सुरू होते. सखाराम हा तसा पंजाचा परंपरागत मतदार. लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभेमध्ये पंजाच्या झालेल्या घसरगुंडीने सखाराम मनातून दुःखी झालेला. महापालिका निवडणुकीतून पुन्हा "पंजा' स्वतःचे अस्तित्व सिद्ध करेल, असा विश्‍वास त्यांना होता. त्यामुळे पक्ष नेतृत्वाच्या दृष्टिकोनातून सखाराम यांनी जागांची गणिते डोक्‍यात मांडली होती. आघाडी नकोच, अशी त्यांची मनोमन इच्छा.

पक्षातून "आउट गोइंग' सुरू झाल्यावर नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल. पक्षाला नवीन चेहरा मिळेल. मतदार या नव्या चेहऱ्यांना पसंती देतील, असं ते तुकारामांना पटवून देत होते. नाही म्हटलं तरीही एका पिढीएवढ्या वर्षांची या दोघांची मैत्री, पण आता आघाडीच्या मुद्द्यावरून त्यांच्यामध्ये झालेली बिघाडी वाढत चालली होती. आघाडी केल्याशिवाय सत्ता नाही, असे मत तुकाराम यांचे होते. कमळाचे उमलते फूल आणि धनुष्यबाण यांच्यात झालेल्या युद्धाचा आघाडीलाच फायदा होईल, असे तुकाराम डोळे मिचकवत म्हणाले. या वाक्‍यानंतर सखाराम आणि तुकाराममध्ये खडाखडीला सुरवात झाली.

पक्षाशी एकनिष्ठ असलेले सखाराम यांनी आघाडीला विरोध केला. पक्षाने कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे. पंजा आजही मतदारांना आपला वाटतो. त्यांच्यापर्यंत फक्त पोचले पाहिजे. आपल्याला निश्‍चित आशादायक निकाल मिळेल. महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची बाजू मांडणारे तुकाराम मात्र आघाडी कधी होईल, याकडे डोळे लावून बसले होते. त्यामुळे "ब्रेकिंग न्यूज'ने त्यांच्यात नवचैतन्य निर्माण झाले होते. आघाडी होणार. सत्ता येणार. या कल्पनेनेच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. विकास आराखडा, बांधकाम व्यावसायिकांची दंडाची प्रकरणे डोळ्यांसमोर आली. इतक्‍यात टीव्हीवर पक्षश्रेष्ठींचा "बाइट' सुरू झाला. पुढे काय होणार हे पाहण्यासाठी सखाराम आणि तुकाराम दोघांचेही डोळे झर्रकन टीव्हीवर खिळले.

Web Title: Breaking news got revitalize