पुण्यात 8 नोव्हेंबरला ब्रेस्ट कॅन्सर 'सरव्हायव्हर्स परिषद'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

नाग फाऊंडेशनच्या वतीने यंदा पुण्यातील यशदामध्ये येत्या 8 व 9 नोव्हेंबर रोजी दोन दिवसीय ब्रेस्ट कॅन्सर सरव्हायव्हर्स परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे : नाग फाऊंडेशनच्या वतीने यंदा पुण्यातील यशदामध्ये येत्या 8 व 9 नोव्हेंबर रोजी दोन दिवसीय ब्रेस्ट कॅन्सर सरव्हायव्हर्स परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये स्तनाच्या कर्करोगावरील उपचार पूर्ण केलेल्या महिंलासमोर असलेल्या वैद्यकीय व बिगर वैद्यकीय प्रश्‍नांचे निराकरण केले जाते, असे प्रख्यात कर्करोगतज्ज्ञ व सह्याद्री हॉस्पिटलमधील ब्रेस्ट कॅन्सर विभागाच्या संचालिका डॉ. शोना नाग यांनी गुरुवारी (ता. ३१) पत्रकार परिषदेत सांगितले.       यामध्ये पुणे, मुंबई नाशिक, गोवा औरंगाबाद आणि अहमदनगर येथून तीनशेहून अधिक सरव्हायव्हर्स सहभागी होणार आहेत. यंदा या परिषदेचे आठवे वर्ष असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

याशिवाय दरवर्षी जानेवारी महिन्यात मुंबईमध्ये 'द इयर इन रिव्हिव' या परिषदेचे आयोजन करण्यात येते. यामध्ये देशभरातून आघाडीचे कर्करोगतज्ञ सहभागी होत असतात. सन 2020 हे या परिषदेचे पाचवे वर्षे आहे. या परिषदेत नाग फाउंडेशन व डब्ल्यूसीआय यांच्यातर्फे डब्ल्यूसीआय-नाग फाऊंडेशन ब्रेस्ट कॅन्सर रिसर्च पुरस्कार दिला जातो. यासाठी भारतातील पन्नास वर्षे वयाच्या आतील दोन कर्करोगशास्त्रज्ञ व कर्करोगतज्ञ यांची निवड केली जाते.

कर्करोगाच्या क्षेत्रात संशोधनाला चालना मिळावी, हा या पुरस्काराचा हेतू आहे. प्रत्येकी रोख दहा लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Breast Cancer Survive Council organised in Pune on 8th November