बघा राजकारण, दुपारी बारापर्यंत अजितदादांसोबत अन् रात्री बाराला मुख्यमंत्र्यांसोबत

Bapu Pathare
Bapu Pathare

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पुण्यात दुपारी वडगावशेरीत अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील टिंगरे यांचा प्रचार करीत असलेले माजी आमदार बापू पठारे रात्री भाजपच्या कमळात जाऊन बसले. 

पठारे म्हणजे अजितदादांचे लाडके सहकारी अशी ओळख. 2007 मध्ये पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता येताच पठारेंना स्थायी समितीच अध्यक्ष केले होते. 2012 मध्ये वडगावशेरी मतदारसंघात सगळीकडे राष्ट्रवादीचे वर्चस्व असताना योगेश मुळीक यांच्या विजयामुळे कमळ फुलले. या भागातील पहिला भाजप नगरसेवक महापालिकेत आला.

2014 मध्ये त्यांचा भाऊ जगदीश मुळीक हे आमदार म्हणून निवडून आले. याला निमित्त ठरेल ते राष्ट्रवादीतील पठारे आणि सुनिल टिंगरे यांचे भांडण. म्हणजे अडीच वर्षात या भागात एक भाऊ नगरसेवक आणि दुसरा आमदार अशी भाजपची ताकद. बापु पठारेंच्या त्रासाला वैतागून 2017 मनपा निवडणुकीत राष्ट्रवादीतील अनेक नगरसेवक (ज्यांच्यामुळे वडगाव शेरी बालेकिल्ला समजला जायचा) भाजपवासी झाले. आज वडगाव शेरीत पठारे यांच्यामुळेच राष्ट्रवादीपेक्षा भाजपचे नगरसेवक जास्त आहेत. अवघ्या 10 वर्षांत वडगाव शेरीतील राष्ट्रवादीचे वैभव लयास गेले. वेळ बदलल की माणसही बदलतात. एकेकाळी सामान्य वाटणारे मुळीक बंधू आता या भागातील पॉवर झाली आहे. 2009 मध्ये बापू पठारे कुटुंबीयांचे असेच वर्चस्व होते. त्यांच्या विरोधात कोणीही उभे राहत नव्हते. अजितदादाही पठारेंवर जाम खूश होते.

पण 2014 च्या विधानसभा व 2017 च्या महापालिका निवडणुकीनंतर सगळ काही बदलले. महिन्या भरापुर्वी आताचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील टिंगरे आणि बापु पठारे हे दोघे भांडण विसरून एकत्र आले, मुळीक यांना धोबीपछाड करणार म्हणून जाहीर केले.
टिंगरे यांना (टिंगरे हे देखील अजित पवारांचे लाडके बर का) उमेदवारी मिळाली आणि पठारे यांनी स्वागत केले. खांद्याला खांदा लावून प्रचार सुरू केला. पण आपल्यापेक्षा ज्युनिअर कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली, आपल्याला टाळलं या विचाराने बापू अस्वस्थ होते. कार्यकर्ते म्हणत होते, बापू राष्ट्रवादीची साथ सोडा, भाजपमध्ये चला. पण बापूंनी निवडणूक रंगात आल्यावर स्वतःचा रंग दाखवला.

सोमवारी सकाळी अजित पवार वडगाव शेरीत टिंगरे यांच्या प्रचाराला आले, त्यावेळी बापू पठारे दादांसोबत एकाच गाडीत "मी प्रचंड आशावादी मी राष्ट्रवादी" हे गाणे मनात गुणगुणत, हात ऊंचावून तो हलवत अभिवादन (कदाचित टाटा करत, मी भाजपमध्ये चाललो असे म्हणत असावेत) करत, टिंगरे यांना मत द्या (टिंगरे को वोट मत दो) असे म्हणत प्रचार केला. दुपारी बारा वाजले आणि पठारे यांनी नवीन गाणे गुणगुणायला सुरुवात केली. "जाऊ द्या ना घरी (भाजपमध्ये) आता वाजले की बारा (राष्ट्रवादीचे)". 
दादा पुढच्या प्रवासाला गेले, पठारे मुळीक यांना भेटले. मग दोघे एकाच गाडीत मुंबईकडे रवाना झाले. दुपारी 12 वाजता भर उन्हात दादांच्या छत्रछायेखाली असलेले पठारे रात्री 12 वाजता देवेंद्राच्या उबदार सत्तेच्या कुशीत जाऊन झोपले.

राजकारणात सगळे अनपेक्षित असत, धक्का तंत्र हा राजकारणाचा स्थायी भाव आहे. दादांचे लाडके असल्याने दादांना कधी भेटलात शेवटचे असे विचारले त्यावर पठारे म्हणाले, "दुपारी १२ पर्यंत दादा सोबतच होतो की, एकत्र प्रचार केला, आता उद्या फोटो बघाल पेपरमध्ये प्रचार करतानाचा. मला गेल्या ५ वर्षात पक्षात मान मिळाला नाही, सततचा अपमान बघून कार्यकर्ते पक्ष बदला म्हणत होते. नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागला. "बापूंचे ही खरेच म्हणावे लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com