साठवलेले पैसे मागितल्याच्या रागातून भावाकडून बहिणीचा खून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 एप्रिल 2019

मुलीच्या लग्नासाठी मानलेल्या भावाकडे 12 वर्ष ठेवलेले पैसे मागितल्याच्या कारणावरुन मानलेल्या भावाने बहिणीचा गळा आवळून खून केला.

पुणे : मुलीच्या लग्नासाठी मानलेल्या भावाकडे 12 वर्ष ठेवलेले पैसे मागितल्याच्या कारणावरुन मानलेल्या भावाने बहिणीचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना शनिवारी सिंहगड रस्त्यावरील हिंगणे परिसरात घडली. 

कस्तुरी शेखर माने (वय 45, रा. शिवपार्वती बंगला, साईनगर, हिंगणे खुर्द) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी प्रज्वल शेखर माने (वय 19) यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन रविंद्र श्रीनिवास जालगी (रा.बराटे चौक, कर्वेनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नृत्यदिग्दर्शक आहेत. फिर्यादीच्या आईने त्यांची बहिण लावण्या हिच्या लग्नासाठी मानलेला भाऊ रविंद्र जालगी याच्याकडे पैसे साठवित होत्या. मागील दहा ते बारा वर्षांमध्ये त्यांनी 14 ते 15 लाख रुपयांची रक्कम जालगी याच्याकडे पाठविली होती. दरम्यान, मुलगी लावण्याचे लग्न नुकतेच ठरल्यामुळे फिर्यादीच्या आई जालगीकडे त्यांनी ठेवण्यासाठी दिलेले पैसे मागत होत्या. मात्र जालगी वेगवेगळी कारणे सांगून त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करत होता.

दरम्यान, याच कारणावरुन शुक्रवारी फिर्यादी यांची आई व जालगी यांच्यात भांडणे झाली. त्यावेळी जालगी याने फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचे नाटक करुन फिर्यादी यांच्या आईस घाबरवित होता. "यापुढे तु माझ्याकडे पैसे मागितले, तर दोघांपैकी एक जण मरणार' अशा शब्दात त्यांना धमकी दिली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी फिर्यादी कामानिमित्त घराबाहेर निघून गेले. त्यावेळी जालगी याने घरी येऊन भांडणाचा राग मनात धरून फिर्यादींच्या आईचा गळा दाबून खून केला.

Web Title: brother murder of his sister for Financial Reason