बीआरटी निधीचे बाकड्यांसाठी वर्गीकरण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

कोट्यवधींच्‍या प्रस्तावांना सर्वसाधारण सभेची एकमताने मंजुरी

कोट्यवधींच्‍या प्रस्तावांना सर्वसाधारण सभेची एकमताने मंजुरी

पुणे - निवडणुकीच्या तोंडावर नव्या प्रभागांमधील मतदारांना भुरळ घालण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नगरसेवकांनी राजकीय मतभेद विसरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नव्या प्रकल्पांबरोबरच कोट्यवधी रुपयांच्या वर्गीकरणांच्या प्रस्तावांनाही एकमताने मंजुरी दिली. रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण, विद्युत व्यवस्था, बाकडे, बसथांबे, समाज मंदिरे उभारण्याला नगरसेवकांची पसंती असल्याचे यानिमित्ताने दिसून आले. विशेष म्हणजे, कोथरूड ते विश्रांतवाडीदरम्यानच्या नियोजित बीआरटी मार्गासाठीच्या एक कोटी रुपयांचा निधी काँक्रिटीकरण, पदपथ आणि बाकडे उभारण्यासाठी वर्गीकरणाद्वारे वळविण्यात आला. स्वारगेट येथील उड्डाण पूल आणि शिवसृष्टीचा निधी वर्गीकरणाद्वारे अन्य कामांसाठी उपलब्ध करून देण्यात आला. 

महापालिकेची आगामी निवडणूक पुढील महिन्यात होणार असल्याने मतदारांना चांगल्या सेवा-सुविधा पुरविण्यालाच प्राधान्य असल्याचे नगरसेवक भासवत आहेत. तसेच, पाच वर्षांपूर्वी गेल्या निवडणुकीच्या आधी दिलेल्या आश्‍वासनांची आठवण त्यांना आता झाली आहे. त्यामुळे मतदारांनी दिलेल्या ‘वचने’ पूर्ण करण्याची धडपड नगरसेवकांची आहे.

त्याचाच भाग म्हणून, आपल्या प्रभागांमधील प्रस्ताव मंजूर व्हावेत, यासाठी सामंजस्याची भूमिका घेत, शेवटच्या सर्वसाधारण सभेत प्रस्तावांना सरसकट मंजुरी मिळाली. त्यात प्रामुख्याने निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच नगरसेवकांनी आपापल्या प्रभागांमधील योजनांचे प्रस्ताव मांडले होते. काही प्रस्ताव एकत्र येत तर, काही प्रस्तावांना बहुमताच्या जोरावर मंजुरी देण्यात आली. गल्लीबोळातील रस्त्यांचे डांबरीकरण आणि काँक्रिटीकरणाच्या कामे करण्याकडे अनेक प्रभागांमधील नगरसेवकांचा कल असल्याचे वर्गीकरणाच्या प्रस्तावावरून दिसून आले. तसेच, चौका-चौकासह सोसायट्यांमध्ये लाखो रुपये खर्च करून बाकडे उभारण्याला त्यांची पसंती राहिली आहे. एरवी, राजकारण करीत, एकमेकांच्या प्रस्तावाला विरोध करणाऱ्या नगरसेवकांनी या सभेत मात्र, एकाही प्रस्तावाला विरोध दर्शविला नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे प्रस्तावांना मंजुरी मिळाली. दरम्यान, शहराच्या विविध भागात महापालिकेने उभारलेल्या गाळ्यांचे वाटप करण्यास सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.  

गणेश चांदणेच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत
आंबिल ओढ्यातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीत वाहून गेल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या गणेश चांदणे याच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्या संदर्भातील प्रस्तावाला सर्वसाधारण सभेतही मंजुरी देण्यात आली. मात्र, ही मदत वेळेत देण्याची अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली.

Web Title: BRT funds for classification bench