बीआरटी त्रुटीमुक्त करा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

पुणे - सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गातील त्रुटींची दखल केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनीही घेतली आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचा आदेश त्यांनी महापालिका आणि पीएमपी प्रशासनाला दिला आहे. प्रसंगी त्यासाठी अहमदाबाद येथील ‘जनमार्ग’ बीआरटीचीही पाहणी करण्यास सांगितले आहे. 

‘सकाळ’ने ‘हुकलेली बीआरटी’ या वृत्तमालिकेद्वारे सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गातील त्रुटी नुकत्याच उघडकीस आणल्या होत्या. त्याबाबत फेसबुक, व्हॉट्‌सॲपद्वारेही नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरम्यान, गडकरी नुकतेच पुण्यात आले होते. तेव्हा पीएमपीमधील आगारांच्या विकासाबाबत चर्चा करण्यासाठी पीएमपीचे संचालक व नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांनी त्यांची भेट घेतली. त्या वेळी गडकरी यांनी बीआरटीतील त्रुटींची दखल घेतली. ‘सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी पुण्यात बीआरटीची गरज आहे. पण, त्यात त्रुटी ठेवू नका. नागरिकांनाही या प्रकल्पात सहभागी करून घ्या. महापालिकेला सांगून बसथांबे, मार्ग, त्यांचा आराखडा याबाबत काही त्रुटी असल्यास त्यांची सोडवा,’ असे बजावले. 

अहमदाबाद येथील जनमार्ग बीआरटी चांगल्या पद्धतीने सुरू आहे. तिची पाहणी करून त्या धर्तीवर पुण्यात सुधारणा करा, असेही गडकरी यांनी सांगितल्याची माहिती शिरोळे यांनी दिली. दरम्यान, पीएमपीच्या शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील १३ आगारांच्या विकासासाठी वाहतूक मंत्रालयामार्फत सहकार्य करण्याची तयारी त्यांनी दर्शविली. त्यासाठीचा प्रकल्प अहवाल सादर करा. त्याची तपासणी करून त्याबाबत आवश्‍यक असलेले सहकार्य वाहतूक मंत्रालयामार्फत करु, असे त्यांनी सांगितल्याचे शिरोळे यांनी सांगितले. 

Web Title: BRT issue