‘बीआरटी’ आता टाकणार कात

‘बीआरटी’ आता टाकणार कात

पुणे -  ‘‘शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी बीआरटी सक्षम करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे,’’ अशी ग्वाही महापौर मुक्ता टिळक यांनी रविवारी दिली. बीआरटीसाठी उपयुक्त ठरतील अशा ३०० सीएनजी बस भाडेतत्त्वावर घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. 

शहरातील बीआरटी प्रकल्पांची अवस्था दयनीय झाली आहे. त्या बाबतचे वृत्त ‘सकाळ’ने रविवारी (ता. १२) प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन बीआरटीबाबत महापालिकेच्या भूमिकेची माहिती टिळक यांनी दिली. त्या म्हणाल्या, ‘‘शहरात बीआरटी उत्तमरीत्या कार्यान्वित करायची आहे. त्यासाठी पायाभूत सुविधा वाढविल्या जातील. 

सातारा रस्त्यावर बीआरटीचे काम रेंगाळल्यामुळे तेथील कंत्राटदारावर कारवाई करण्याची सूचना पथ विभागाला दिली आहे. पुणे-मुंबई आणि विद्यापीठ रस्त्यावरील काम लवकर मार्गी लागेल, याकडे लक्ष देणार आहे. यापूर्वी बीआरटीसाठी बस नव्हत्या. परंतु आता नव्या बस येण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे बीआरटीकडे पुरेसे लक्ष देऊन ती सक्षम केली जाईल.’’

शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये बीआरटीची गरज आहे. त्यामुळे बीआरटीमध्ये सुधारणा करण्यासाठी दोन्ही महापालिकांकडे पाठपुरावा सुरू आहे. बीआरटी चांगल्या पद्धतीने कार्यान्वित होईल, याकडे लक्ष असेल. 
- नयना गुंडे, अध्यक्षा, पीएमपी 

बीआरटीची अंमलबजावणी कशी आणि कधी करणार, हे पालिकेने जाहीर केले पाहिजे. तसेच बीआरटीसाठी स्वतंत्र ‘एसपीव्ही’ किंवा विभाग स्थापन करण्याची गरज आहे. तसेच किमान ३०० बस ताफ्यात आणाव्यात. 
- रणजित गाडगीळ, परिसर संस्था

मेट्रोच्या तुलनेत बीआरटीचा खर्च कमी आहे आणि त्यातून मोठ्या संख्येने प्रवाशांची वाहतूक होऊ शकते, हे वास्तव आहे. परंतु बीआरटी करताना ‘फिडर सर्व्हिस’कडेही लक्ष द्यायला हवे. मेट्रोला पूरक अशी बीआरटीची रचना हवी. 
- डॉ. प्रताप रावळ, सीआईपी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com