#PuneBRT वाहतूक कोंडीवर ‘बीआरटी’ हाच उपाय!

brt-traffic-issue
brt-traffic-issue

स्वारगेट- शहरातील प्रमुख ३४ रस्त्यांवर दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाढत असून, त्याला सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, हाच एकमेव उपाय आहे. शहरातील वाहनांची संख्या ३० लाखांपेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे शहरातील रस्ते आता अपुरे वाटू लागले आहेत. रस्त्यांची रुंदी वाढत नसल्यामुळे वाहने सामावून घेण्याची त्यांची क्षमताच संपली आहे. त्यामुळे कोंडी दूर करण्यासाठी ‘बीआरटी’ उपयुक्त ठरणार आहे. 

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मेट्रोचा खर्च बीआरटीच्या तुलनेत मोठा आहे. बीआरटी ही स्वस्तात आणि जास्तीतजास्त सुविधा देऊन प्रवाशांना माफक दरात सेवा देते. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेचीही बचत होते, हे शहरात यापूर्वी सातारा रस्ता, हडपसर रस्ता व नगर रस्त्यावरून सिद्ध झाले आहे. मात्र, मधल्या काळात शहरातील बीआरटी टप्प्याटप्प्याने बंद पडत गेली. त्यामुळे पीएमपीच्या बस वाहतूक कोंडीत अडकतात आणि प्रवाशांचा प्रवासाचा वेळ वाढतो. पर्यायाने प्रवासी स्वतःच्या वाहनांचा वापर करण्यास सुरुवात करतात आणि रस्त्यांवरील वाहनांची गर्दी वाढते, असे दुष्टचक्र निर्माण झाले आहे. म्हणूनच शहरात सुमारे १०० किलोमीटर बीआरटीचे जाळे निर्माण करण्याचा ठराव महापालिकेने मंजूर केला आहे. 

बंगळूरमध्ये पुण्याच्या तिप्पट बस आहेत. त्या वाहतूक कोंडीत अडकत असल्याने प्रवाशांची वेळेत बचत होत नाही. मेट्रोमुळेही या शहरातील कोंडी सुटलेली नाही. त्यामुळेच बंगळूरमध्येही बीआरटीची मागणी जोर धरू लागली आहे. 

बीआरटीचे फायदे 
  स्वतंत्र लेनमुळे विना अडथळा प्रवास
  पीएमपीमधील प्रवाशांचा वेळ वाचतो 
  आरामदायी प्रवास अन पुढील थांब्यांची माहिती 
  एका बसच्या फेरीमुळे १०० खासगी वाहने रस्त्यावर येण्यापासून वाचवते 
  स्वतंत्र मार्गामुळे बसची झीज कमी होते 
  कमी डिझेलमध्ये बस जास्त अंतर धावतात
  थांब्यांवरील लेव्हल बोर्डिंगमुळे ज्येष्ठांना विना पायऱ्या चढ-उतार करता येते

बीआरटी समज आणि गैरसमज
१) दरवेळी थांब्यावर जाण्यासाठी रस्ता ओलांडावा लागतो.
- बीआरटी स्थानक सहसा सिग्नलसोबत असल्याने रस्ता ओलांडणे तुलनेत सोपे जाते. 
२) बीआरटीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
- बीआरटी मार्गावर एका बसच्या फेरीत १०० वाहनांना अटकाव होतो; कारण एवढे प्रवासी बसमधून प्रवास करतात.
३) बसलेन म्हणजे बीआरटी 
- अनेक नागरिक बस लेनलाच बीआरटी समजतात; पण बीआरटीमध्ये स्वच्छ स्थानके, पायरी न चढता बसमध्ये जाण्याची सोय, आयटीएमएस यंत्रणा तसेच स्मार्टफोन ॲप, स्मार्ट कार्ड आदी सुविधा असतात.
४) फक्त मोठ्या रस्त्यावरच बीआरटी करता येते 
- जर एका लेनचे रूपांतर बीआरटीमध्ये केल्यास त्या लेनची माणसे वाहून नेण्याची क्षमता जवळपास दुप्पट होते. त्यामुळे काही शहरांनी १+१ लेनच्या रस्त्यावरही बीआरटी केली आहे. जगातील अनेक शहरांत वर्दळीच्या रस्त्यावर अगदी नऊ मीटर रुंद रस्त्यावरही बीआरटी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com