बीआरटी टर्मिनलच्या कामाचा विसर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

वाघोली - वाघोलीतील दोन एकर जागा बीआरटी टर्मिनलसाठी देऊन आठ महिने उलटले, तरी अद्यापही टर्मिनलच्या कामाला सुरवात झालेली नाही. जागेचा ताबा मिळाल्यानंतर त्वरित सुसज्ज टर्मिनल उभारले जाईल, असे महापालिकेकडून सांगण्यात येत होते, मात्र त्याचा अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना विसर पडला की काय, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयाने 17 मार्च रोजी वाघोलीतील केसनंद फाट्यावरील दोन एकर जागेचा ताबा महापालिकेला दिला. त्या जागेतील अतिक्रमणेही त्याचदिवशी हटविण्यात आली. जागा ताब्यात मिळाल्यानंतर त्वरित तेथे सुसज्ज टर्मिनल उभारले जाईल, असे महापालिका व पीएमपी अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र टर्मिनल उभारणे दूरच; पण त्या जागेत सपाटीकरणाचे व राडारोडा हटविण्याचे कामही महापालिकेने केलेले नाही. पावसाळ्यात तेथे मोठ्या प्रमाणावर दलदल निर्माण झाली होती. त्यामुळे प्रवासी व पीएमपी कर्मचाऱ्यांचे हाल झाले. ज्या जागेत बसशेड उभारण्यात आले आहे, तेथील जागेचे सपाटीकरण केलेले नाही. खड्ड्यांतून प्रवाशांना बस पकडण्यासाठी पळावे लागते. तेथे बसबरोबरच खासगी वाहनेही थांबतात. या जागेत पुन्हा अतिक्रमणांना सुरवात झाली होती. मात्र पोलिस व महसूल विभागाने ती पुन्हा हटविली. या जागेच्या देखरेखीसाठी महापालिकेचे कर्मचारी नाहीत. तेथे सुविधांचा अभाव असल्याने पीएमपी कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. 

महापालिकेला जागा ताब्यात देऊन आठ महिने झाले आहेत. तेथे अद्याप कोणतेही काम केलेले नाही. तेथील गैरसोयींमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्वरित काम सुरू न केल्यास तेथील जागेत बस फिरकू देणार नाही. याबाबत महापालिका आयुक्त व पीएमपी प्रशासनाला पत्र दिले आहे. 
संदीप सातव, अध्यक्ष, शिरूर-हवेली मनसे. 

Web Title: brt wagholi