बीआरटीचा चुकला ट्रॅक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

पुणे - पुणेकरांना जलद गतीने प्रवास करता यावा, या उद्देशाने पुणे-सातारा रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करून ‘बस रॅपिड ट्रान्स्पोर्ट’ अर्थात, बीआरटी सेवा सुरू केली. मात्र, योजनेचा मूळ उद्देश फसल्यानंतरही तब्बल ७० कोटी रुपयांतून पावणेसहा किलोमीटर लांबीच्या मार्गाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि, वर्ष लोटल्यानंतरही हे काम पूर्ण झाले नाही. उलटपक्षी या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असून, येथील बीआरटी योजनेचा ‘ट्रॅक’ चुकल्याचे पावलोपावली जाणवते. 

पुणे - पुणेकरांना जलद गतीने प्रवास करता यावा, या उद्देशाने पुणे-सातारा रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करून ‘बस रॅपिड ट्रान्स्पोर्ट’ अर्थात, बीआरटी सेवा सुरू केली. मात्र, योजनेचा मूळ उद्देश फसल्यानंतरही तब्बल ७० कोटी रुपयांतून पावणेसहा किलोमीटर लांबीच्या मार्गाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि, वर्ष लोटल्यानंतरही हे काम पूर्ण झाले नाही. उलटपक्षी या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असून, येथील बीआरटी योजनेचा ‘ट्रॅक’ चुकल्याचे पावलोपावली जाणवते. 

बसथांब्यांसोबतच मार्गाच्या दोन्ही बाजूंनी उभारलेले लोखंडी ग्रील चोरीला गेल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. या मार्गावर सुरक्षारक्षक नेमले आहेत का, ठेकेदाराकडून काम सुरू आहे का, हे पाहण्यासाठी संपूर्ण मार्ग फिरल्यानंतरही कुठेच सुरक्षारक्षक दिसले नाहीत. काम सुरू असल्याचेही कुठे दिसले नाही.

शहरातील हा पथदर्शी प्रकल्प (पायलट प्रोजेक्‍ट) बंद पडल्यात जमा आहे. तरीही या मार्गासाठी ७० कोटी रुपयांचा निधी कमी पडल्याचे दाखवून महापालिकेच्या पथ विभागाने आणखी ३० कोटींच्या कामांच्या निविदा काढल्या आहेत. मार्गाची पुनर्रचना करीत असताना पाण्याच्या वाहिन्या, विद्युत वाहिन्या आणि अन्य स्वरूपाची जादा कामे करावी लागल्याने प्रकल्पाचा खर्च वाढल्याचे कारण हा विभाग देत आहे. मुळात मुदत संपल्याचा ठेकेदाराला जाब विचारून काम पूर्ण करणे अपेक्षित असताना अधिकाऱ्यांकडून मात्र आणखी ३० कोटी रुपये देत ठेकेदारावर मेहरनजर दाखविली जात आहे. 

या मार्गाच्या पुनर्रचनेचे काम गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हाती घेण्यात आले. त्यानंतर पहिल्या सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. तसे झाले नाही, तेव्हा १८ डिसेंबरला काम संपविण्याचा शब्द ठेकेदाराने दिल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. वर्षभराची मुदत संपली, तरी कुठेच काम सुरू नाही. त्यामुळे ते कधी पूर्ण होईल, असा प्रश्‍न अधिकाऱ्यांना विचारला, तर येत्या मे महिन्यात होईल, असे उत्तर मिळाले; पण किती कामे झाली आहेत, याचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते. 

दरम्यान, महापौर मुक्ता टिळक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, माजी महापौर दत्ता धनकवडे, नगरसेविका राणी भोसले यांनी मार्गाची पाहणी करीत महापालिकेचे अधिकारी आणि ठेकादाराला सुनावले होते. त्यालाही नऊ महिने झाले. तरीही त्यांच्या भेटीचे फलित दिसलेले नाही. 

मार्गाची पुर्नरचना म्हणजे दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यात मुख्य मार्ग, बसथांबे, पथपद, सायकल ट्रॅक आदी कामांचा समावेश आहे. या माहिन्यात काम पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र भूमिगत वाहिन्या बदलण्याची कामे करावी लागल्याने उशीर होत आहे. निधी कमी पडल्याने तो उपलब्ध करून दिला आहे.
- अनिरुद्ध पावस्कर, प्रभारी, पथ विभाग, महापालिका 

रस्त्यावरील बीआरटी मार्गाचे काम आता लवकर करण्याबाबत अधिकारी-ठेकेदाराला सूचना केल्या आहेत. काही आवश्‍यक कामे करावी लागत असल्याने हे काम मुदतीत होऊ शकलेले नाही. मात्र, दिरंगाई झाल्यास कारवाई करावी लागणार आहे. 
- मुक्ता टिळक, महापौर

Web Title: BRT Wrong Track