बीआरटीचे तीन नवीन मार्ग 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

पुणे - शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी गणेशखिंड रस्ता, जुना पुणे-मुंबई रस्ता आणि जंगली महाराज रस्ता या तीन रस्त्यांवर बीआरटीचे नवे मार्ग सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे 165 कोटी रुपये खर्च येणार असून, तीन वर्षांत तीनही मार्गांवर बीआरटी सेवा सुरू होईल, असे नियोजन महापालिकेने केले आहे. 

पुणे - शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी गणेशखिंड रस्ता, जुना पुणे-मुंबई रस्ता आणि जंगली महाराज रस्ता या तीन रस्त्यांवर बीआरटीचे नवे मार्ग सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे 165 कोटी रुपये खर्च येणार असून, तीन वर्षांत तीनही मार्गांवर बीआरटी सेवा सुरू होईल, असे नियोजन महापालिकेने केले आहे. 

शहरात 109 किलोमीटरचे बीआरटीचे मार्ग सुरू करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. त्याअंतर्गत नगर रस्त्यावर 9 आणि विश्रांतवाडीमध्ये 7 किलोमीटरचे मार्ग सुरू झाले आहेत, तर कात्रज-स्वारगेट-हडपसर रस्त्यावर 16 किलोमीटरचा मार्ग यापूर्वी कार्यान्वित झाला आहे. मात्र, त्यात आलेले अडथळे दूर करून त्यांची फेररचना करण्याचेही काम महापालिकेने हाती घेतले आहे. आता पुढील 13 किलोमीटरचा टप्पा महापालिकेने हाती घेतला आहे, अशी माहिती महापालिकेचे पथ विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत यांनी दिली. 

बीआरटीच्या नव्या मार्गांवर एकूण 26 स्थानके असतील. त्यात इंटलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमचा (आयटीएमएस) अंतर्भाव असेल. स्थानकावर येण्यापूर्वी थांब्यावर बसच्या मार्गाच्या क्रमांकाची माहिती मिळणार आहे; तसेच बसमधील प्रवाशांनाही प्रवासात येणाऱ्या थांब्यांची माहिती मिळेल. स्थानकावर "लेव्हल बोर्डिंग', स्वयंचलित दरवाजे असतील. खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या अखत्यारितील सुमारे 2 किलोमीटरच्या रस्त्यावरही महापालिका बीआरटी उभारणार आहे. बीआरटीसाठी स्वतंत्र मार्ग आणि अन्य वाहनांसाठी सुमारे सहा मीटरचे रस्ते दुतर्फा उपलब्ध असतील, असेही त्यांनी सांगितले. 

"स्थायी'ची मंजुरी मिळताच काम सुरू 
महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी पुढील वर्षी 31 मार्चपर्यंत शहरात सुमारे 30 किलोमीटरचे मार्ग सुरू करण्याचे सूतोवाच केले आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात आता 13 किलोमीटर मार्गांचे काम सुरू होणार आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या असून, 8 नोव्हेंबर रोजी त्या फोडल्या जातील. त्यानंतर स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल. सुमारे तीन वर्षांत काम पूर्ण होईल, अशी महापालिकेची अपेक्षा आहे. 

बीआरटीचे नवे मार्ग 
- वेधशाळेजवळचा खुडे चौक ते औंधचा राजीव गांधी पूल - अंतर 5.7 किलोमीटर - स्थानके 11 
- पाटील इस्टेट चौक ते बोपोडीचा हॅरिस पूल - अंतर 6.2 किलोमीटर - स्थानके 13 
- संगमवाडी ते महापालिका भवन - अंतर 1.2 किलोमीटर - स्थानके 2 

बीआरटी मार्गांची प्रत्येकी रुंदी - 3.5 मीटर, सायकल ट्रॅक - 2 मीटर, पदपथ 3 मीटर 

सातारा रस्त्यासाठी 74 कोटी 
सातारा रस्त्यावर कात्रज चौक ते व्होल्गा चौकादरम्यानच्या 5.4 किलोमीटर रस्त्याची आता फेररचना होणार आहे. दोन्ही बाजूला तीन मीटर रुंदीचे पदपथ, अडीच मीटरचे सायकल ट्रॅक असतील, तर सरासरी दुतर्फा प्रत्येकी 9 मीटरचा रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध राहणार आहे. या रस्त्यावर दोन्ही बाजूला असलेल्या सर्व्हिस लेनच्या रस्त्यांचे रुंदीकरण करून पादचारी आणि सायकलस्वारांसाठी सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. या रस्त्यावर बीआरटीच्या 9 स्थानकांचेही रूप पालटण्यात येणार आहे. त्यात सार्वजनिक स्वच्छतागृहांचाही समावेश असेल. कामासाठी महापालिका सुमारे 74 कोटी रुपये खर्च करणार असून, 19 नोव्हेंबर रोजी विधान परिषदेची आचारसंहिता संपल्यावर स्थायी समितीने निविदा मंजूर केल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल आणि ते दोन वर्षांत पूर्ण होईल, असे महापालिका प्रशासनाने सांगितले.

Web Title: BRT's three new routes